नाशिक – कुंभमेळ्यात साधू-महंतांसाठी उभारण्यात येणाऱ्या साधूग्रामकरिता तपोवनातील तब्बल १७०० झाडे तोडणे, पुर्नरोपण करणे वा फांद्यांची छाटणी करावी लागणार असल्याची नोटीस महापालिकेने दिल्यानंतर त्या विरोधात पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत हरकती व सूचनांचा अक्षरश वर्षाव केला आहे. मुदत संपुष्टात येण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत हरकतींची संख्या २०० हून अधिकवर पोहोचली. यावर पुढील सोमवारी अथवा मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कुंभमेळ्यात साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी तपोवनात साधूग्राम तयार केले जाते. आगामी सिंहस्थात सुमारे ११५० एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्याचे नियोजित आहे. तपोवनमध्ये महापालिेकेची ५४ एकर जागा आहे. येथील सुमारे १७०० विविध प्रजातींचे वृक्ष तोडणे, पुनर्रोपण करणे, छाटणी आदींबाबत नोटीस देऊन महापालिकेने हरकती व सूचना मागविल्या होत्या. मंगळवारी त्याची मुदत संपुष्टात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याचे लक्षात आल्यावर पर्यावरणप्रेमीच नव्हे तर, नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सर्व स्तरातून त्यास कडाडून विरोध होत आहे. अनेक मोठ्या, प्रौढ, सावलीदार व परिसंस्थेतील महत्वाच्या झाडांवर पिवळे चिन्ह मारले असून यात कडूनिंब, चिंच, जांभूळ यांसारखी भारतीय ओळख दर्शविणाऱ्या प्रजातीही सुद्धा आढळल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. अनेक झाडे इतकी जुनी, मोठी व पसरट आहेत की, त्यांची प्राचीन अर्थात हेरिटेज वृक्ष म्हणून नोंद होऊ शकते. असे वृक्ष तोडणे हा केवळ पर्यावरणीय नव्हे तर, अध्यात्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या वेदनादायी निर्णय ठरेल, याकडे काहींनी लक्ष वेधले.

१७०० झाडे तोडण्याचा परिणाम नाशिकचे हवामान, जलसाठा आणि हवा गुणवत्तेवर दीर्घकालीन घातक परिणाम करणारा ठरू शकतो. तपोवनसारख्या तपोभूमीत, संतांच्या निवासासाठीच जर इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली तर जगापुढे अत्यंत विसंगत व चुकीचा संदेश जाईल, याकडे पर्यावरणप्रेमींनी लक्ष वेधले. महानगरपालिकेचा प्रस्ताव कायदेशीरदृष्ट्या अनेक प्रश्न निर्माण करतो. राष्ट्रीय हरित लवादानेही वेळोवळी दिलेल्या निर्णयात परिपक्व वृक्ष तोडू नये असे नमूद केलेले आहे. त्यामुळे वृक्षतोडीचा निर्णय तातडीने स्थघित करावा, नागरिकांना हरकतींसाठी योग्य मुदतवाढ द्यावी, तज्ज्ञांसोबत प्रत्यक्ष संयुक्त पाहणी आयोजित करावी, उपलब्ध असल्यास सर्व पर्यावरणीय अहवाल व पर्यायी जागांचे मूल्यमापन सार्वजनिक करावे अशी मागणी हरकतींमधून झाली आहे.

२०० हून अधिक हरकती

मंगळवारी सायंकाळपर्यंत महापालिकेकडे २०० हून अधिक हरकती व सूचना प्राप्त झाल्या. संबंधितांना सुनावणीला बोलावण्यासाठी पत्र व्यवहार केला जाईल. हरकतींची संख्या मोठी असल्याने सोमवारी वा मंगळवारी सुनावणी ठेवली जाईल असे उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी सांगितले. तपोवन परिसरातील झाडे वाचवण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मनपाने विकास कामे हाती घेतली असली तरी जुने वृक्ष जतन करण्याची जबाबदारी प्रथम मनपाची आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी केले.