धुळे : दोन वर्षांपूर्वी ज्या कामावर वीस लाख रुपयांचा घसघशीत निधी खर्च झाला, ती सर्व दहा कुपांची सार्वजनिक शौचालये अक्षरशः गायब झाली. शोध घेतल्यावरही ती कुठेही दिसून येत नसल्याने अखेर शिवसेनेने (उबाठा) शौचालये चोरीस गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तयारी केली.

महापालिका हद्दवाढीत समावेश झालेल्या नकाणे (ता. धुळे) गावात शिवेनेच्या शिष्टमंडळाने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की शिवसेनेचे विधी व न्याय विभागाचे प्रमुख  भूषण पाटील यांनी गेल्या पाच वर्षात नकाणे गावात महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासाची नेमकी कोणती कामे झाली यासंदर्भात महानगर पालिकेकडून माहिती मागविली. यानंतर प्रत्यक्ष झालेल्या कामांची चौकशी केल्यावर भलताच प्रकार उघड झाला.

सन २०२१-२२ मध्ये प्रभाग क्रमांक-६ येथे महानगर पालिकेच्या महिला बालकल्याण निधी अंतर्गत नकाणे गावातील आदिवासी वस्तीत मगन मातंग यांच्या घराजवळ महिलांसाठी १० कुप असलेले सार्वजनिक शौचालय बांधण्याच्या कामासाठी १९ लाख ९८ हजार ८७८ रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या सुलभ शौचालयाचे काम मे.आदर्श कन्स्ट्रक्शन यांनी ९ फेब्रुवारी २०२३  रोजी पूर्ण केल्याचे दर्शवून  महानगरपालिकेच्या तिजोरीतून १९ लाख ९८ हजार ८७८ रुपयांचे बिल  काढून घेण्यात आले आहे.हा प्रकार उघडकीस आल्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे,उप जिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी आणि महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ऍड.बंटी पाटील, भरत मोरे, प्रशांत भामरे, कपिल लिंगायत, अनिल शिरसाट, तेजस सपकाळ आदींनी संबंधित ठिकाणी भेट दिली.

संबंधित आदिवासी वस्तीतल्या ज्या रहिवाशाचा नमोल्लेख करण्यात आला आहे त्या, मगन मातंग यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, की गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम झालेले नसून आजही आदिवासी वस्तीतील महिला प्रात: विधीसाठी उघड्यावरच जात आहेत. सुलभ शौचालयांचे बांधकामच झालेले नाही.या ठिकाणी जवळपास वीस लाख रुपये खर्चातून १० कुप असलेले सार्वजनिक शौचालय उभारण्यात आली आणि त्यासाठी खर्च झालेली रक्कमही काढण्यात आली आहे असे जेंव्हा रहिवाशांना कळाले तेंव्हा मात्र रहिवाशांनी संताप व्यक्त केला.या कामात महानगरपालिकेचे आयुक्त, संबंधित प्रभागाचे अभियंता आणि तत्कालीन स्थानिक माजी नगरसेवक यांनी संगम करून केला आहे असे पत्रकात म्हटले आहे.

याप्रकरणी लवकरच देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात सुलभ शौचालय हरवल्याची तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्ताकडेही करण्यात आली असून  महानगरपालिकेच्या अशा   भ्रष्ट कारभारात सहभागी असलेल्या विरोधात गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे.