scorecardresearch

विनाहेल्मेटधारकांवर दंडात्मक कारवाईचा श्रीगणेशा

अपघातात दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी शहरात हेल्मेटसक्ती लागू केली गेली.

नाशिक : विनाहेल्मेट कारवाईची नाहक झळ शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य व तत्सम घटकांना बसत असताना रस्त्यावरून हेल्मेटविना भ्रमंती करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्यावर आक्षेप घेतले जाऊ लागल्याने अखेर वाहतूक पोलिसांनी गुरुवारपासून प्रत्यक्ष रस्त्यांवर उतरत दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. १२ ठिकाणी झालेल्या तपासणीत दिवसभरात शेकडो विनाहेल्मेट दुचाकीस्वार पोलिसांच्या जाळय़ात सापडले. समुपदेशन व परीक्षेसोबत त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े यांनी खुटवडनगर पोलीस चौकीतील समुपदेशन केंद्रास भेट देऊन आढावा घेतला.

अपघातात दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी शहरात हेल्मेटसक्ती लागू केली गेली. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध क्लृप्तय़ा लढविल्या गेल्या. हेल्मेटशिवाय वाहनात इंधन देण्यास बंदी घालण्यात आली. पुढे शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, लष्करी आणि औद्योगिक क्षेत्र अशा आस्थापनेत हेल्मेटविना आलेल्या दुचाकीस्वारांच्या प्रवेशावर निर्बंध घातले गेले.  यात जिथे कुठे नियमांचे उल्लंघन झाले, तिथे महाविद्यालयासह अन्य संस्थांचे मालमत्ता अधिकारी व प्राचार्यावर कारवाईदेखील करण्यात आली. या घटनाक्रमात इतरांवर बडगा उगारणारी पोलीस यंत्रणा रस्त्यांवरून हेल्मेटविना भ्रमंती करणाऱ्यांवर मात्र कारवाईस बगल देत असल्यावर नाशिक वृत्तान्तमधून प्रकाशझोत टाकण्यात आला. त्यानंतर अखेर प्रशासनाला जाग येऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा श्रीगणेशा झाला आहे.

विनाहेल्मेट भ्रमंती करणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी गर्दीची १२ ठिकाणे पोलिसांनी आधीच निश्चित केलेली आहे. तिथे वाहनधारकांचे समुपदेशन करून परीक्षा घेतली जाते. या ठिकाणी दंडात्मक कारवाईला सुरुवात झाल्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम गायकवाड यांनी सांगितले. हेल्मेटविना वाहन चालविणाऱ्यांना पहिल्यांदा ५०० रुपये तर दुसऱ्यांदा या नियमाचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

हेल्मेट वापराबाबत वारंवार आवाहन केले जाते. दंडात्मक कारवाईची पूर्वकल्पना देऊनही अनेक वाहनधारक विनाहेल्मेट भ्रमंती करीत होते. दिवसभरात शेकडो वाहनधारकांना दंडात्मक कारवाईला तोंड द्यावे लागले.

वर्षभरात १११ दुचाकीस्वारांचा मृत्यू

शहरात २०२१ या वर्षांत दुचाकींचे ११६ अपघात झाले. त्यात १२४ दुचाकीस्वार मयत झाले. विनाहेल्मेट वाहन चालविल्याने १११ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पोलिसांनी दिली आहे. अपघातातील दुचाकीस्वारांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेट परिधान करणे आवश्यक असल्याकडे वाहतूक शाखेने लक्ष वेधले आहे.

हेल्मेट का परिधान केले नाही..?

खुटवडनगर पोलीस चौकीच्या समुपदेशन केंद्राच्या अंतर्गत ३१ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े यांनी या समुपदेशन केंद्रास भेट दिली. वाहनधारकांशी त्यांनी संवाद साधला. हेल्मेट का परिधान केले नाही, अशी विचारणा केल्यावर वाहनधारकांनी वेगवेगळी कारणे पुढे केली. सुरक्षित वाहतुकीसाठी हेल्मेटची गरज पाण्डय़े यांनी मांडली.

शहरात ठिकठिकाणी विनाहेल्मेट वाहनधारकांना कारवाईला सामोरे जावे लागले.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Punitive action against non helmet riders zws

ताज्या बातम्या