नाशिक – बदलत्या वातावरणात उकाडा कायम असताना सोमवारी दुपारी नांदगाव तालुक्यातील मनमाड शहर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी गारपीटही झाली. याचा फटका कांद्याला बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
टळटळीत ऊन आणि प्रचंड उकाड्याने भाजून निघालेल्या जिल्ह्याच्या तापमानात दोन दिवसात बदल झाल्याचे जाणवत होते. चार दिवसांपूर्वी ४० अंशावर असणारा पारा ३५ अंशाच्या आसपास आला होता. याच सुमारास हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला. रविवारपर्यंत मागमूस नसलेल्या पावसाने सोमवारी काही भागात हजेरी लावली. मनमाड शहर व परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसासोबत १० ते १५ मिनिटे गारपीट झाली. दुपारी एकच्या सुमारास आभाळ भरून आले आणि सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. मेघ गर्जनेसह वाऱ्याचा वेगही वाढला.पावसाचाही वेग वाढला. याच सुमारास गाराही पडल्या. गारा पडल्याने एकच खळबळ उडाली. सुमारे अर्धा तास पाऊस सुरू होता. सखल भागात पाणी साचले.
सध्या ग्रामीण भागात कांदा काढणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेतातून काढलेला कांदा खळ्यात साठवला जातो. अकस्मात आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी कांदा भिजला. शेतकऱ्यांना तो आच्छादित करण्यास वेळ मिळाला नाही. पाऊस व गारपीटीत अनेक ठिकाणी कांदा भिजल्याची धास्ती व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसानंतर काही वेळ वातावरणात गारवा होता. नंतर मात्र पुन्हा ऊन पडल्याने उकाडा वाढला. वाऱ्याचा वेग वाढल्याने कमाल तापमानात चढ-उतार बघायला मिळत आहे.
पारा उंचावला…
रविवारच्या तुलनेत नाशिकच्या तापमानात १.२ अंशांनी उंचावून तो ३६.९ अंशावर गेला. गेल्या गुरुवारी ४० अंशावर असणारे तापमान रविवारी ३५,७ अंशांवर आले होते. चार दिवसांत तापमानात ४.३ अंशांनी घट झाली. पारा उतरल्याने उकाडा काहिसा कमी झाला होता. सोमवारी मात्र काही भागात पाऊस होऊनही पारा उंचावला.
मालेगावमध्येही काही भागात गारपीट
मालेगाव तालुक्यातील कळवाडी व दापुरे या गावात १५ मिनिटे गारपिटीसह पाऊस झाला. इतरत्र अधुनमधून ढगाळ वातावरण होते. ज्या भागात पाऊस झाला ती गावे चाळीसगाव तालुक्याला लागून आहेत. अवकाळीने काढणीवर आलेल्या कांद्याचे नुकसान झाले.