रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपाला मोठा सल्ला दिला आहे. शिवसेना आता ऐकणार नाही, त्यामुळे भाजपाने आता उपमुख्यमंत्रीपद घ्यावं आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावं, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला. यावेळी त्यांनी भाजपाला वाटत होतं की काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. पण भाजपाचा अंदाज चुकला, असंही नमूद केलं. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामदास आठवले म्हणाले, “शिवसेनेचा जो अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला होता त्याप्रमाणे शिवसेना-भाजपाने एकत्र यावं. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न करावा. भाजपाला वाटत होतं की तिन्ही पक्ष एकत्र येणार नाही. आता भाजपाने मोठं मन करावं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेबाहेर करण्यासाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचा विचार करावा.”

” काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही असं भाजपाला वाटलं, पण त्यांचा अंदाज चुकला”

“काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही असं भाजपाला वाटत होतं, मात्र त्यांचा तो अंदाज चुकला. शिवसेना आता ऐकणार नाही. भाजपाने शिवसेनेला ५ वर्ष मुख्यमंत्री पद द्यावं. या मुद्द्यावर भाजपा-शिवसेना एकत्र येऊ शकतात. भाजपने याचा विचार करावा,” असंही रामदास आठवले यांनी सांगितलं.

“देशातील एकूण करोना रूग्णांपैकी २५ टक्के रूग्ण महाराष्ट्रात”

रामदास आठवले म्हणाले, “करोनामुळे देशात ५ लाख मृत्यू झाले आहेत. त्यामुळे गर्दी टाळायला हवी. करोनाचा सामना करण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे, तशी आपली देखील आहे. केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. केंद्रीय मंत्री प्रयत्न करत आहेत. देशातील एकूण रूग्णांपैकी २५ टक्के रूग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे काळजी घ्या.”

हेही वाचा : रामदास आठवलेंचं राज्य सरकारबाबत भाकित; म्हणाले, “महाविकासआघाडी सरकार…!”

“उद्धव ठाकरे यांनी लवकर बर होऊन कोरोना विरोधात दंड थोपटावे, अशी अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे आणि आमचे घरोब्याचे संबंध आहेत. भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली होती,” असंही आठवलेंनी नमूद केलं.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale give new offer to bjp for alliance with shivsena and form government pbs
First published on: 10-01-2022 at 08:55 IST