केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतंच राज्यातील सरकार पुढील वर्षी बदलण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. राज्यात लवकरच भाजपाचं सरकार येणार असल्याचं विधान नारायण राणेंनी केल्यानंतर आता अजून एक केंद्रीय मंत्री असलेले रामदास आठवले यांनी देखील राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या भवितव्याविषयी भाकित वर्तवलं आहे. सांगलीमध्ये पत्रकारांनी नारायण राणेंच्या विधानाविषयी विचारणा केली असता रामदास आठवलेंनी त्याला दुजोरा दिला. तसेच, अडीच वर्ष झाल्यानंतर राज्यात शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाईल, असं देखील रामदास आठवले म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नारायण राणेंनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना याविषयी विधान केलं होतं. “महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नाही त्यामुळे तिथं तसं होतंय. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाहीये. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल”, असं राणे म्हणाले होते.

दरम्यान, राणेंच्या विधानाविषयी विचारणा केली असता रामदास आठवलेंनी त्याला दुजोरा दिला. “यांच्यात इतका वाद आहे की कदाचित अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर कदाचित शिवसेना महाविकासआघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत जाऊ शकते. राणेंनी आपली भूमिका मांडली. असं घडेल असं राणेंना वाटतंय. मला वाटतंय की हे सरकार फार काळ टिकणार नाही. मार्च असो वा एप्रिल. सरकार लवकर जाईल अशी अपेक्षा आहे”, असं आठवले म्हणाले.

“सरकार पाडून नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित…”, नारायण राणेंची नवी राजकीय भविष्यवाणी

“आंदोलक शेतकऱ्यांच्या नेत्यांवर कारवाई व्हावी”

तिन्ही कृषी कायदे केंद्रानं मागे घेतल्यानंतर देखील शेतकरी आंदोलनावर ठाम असल्यामुळे रामदास आठवले यांनी राकेश टिकैत यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. “शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पण आता तिन्ही कायदे मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यायला हवं. ते होत नसेल, तर राकेश टिकैत आणि इतर नेत्यांवर कारवाई होणं आवश्यक आहे. कायदे मागे घेतल्यानंतरही ऊठसूट आंदोलन करणं योग्य नाही. आता आंदोलनाची आवश्यकता नाही. इतर मुद्द्यांवर चर्चेतून मार्ग काढता येऊ शकतो”, असं आठवले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athavle predicts on mahavikas aghadi government in maharashtra pmw
First published on: 27-11-2021 at 12:06 IST