जळगाव – राष्ट्रवादीला (शरद पवार) सोडचिठ्ठी देऊन अजित पवार गटात शनिवारी प्रवेश करण्याचा निर्णय जिल्ह्यातील दोन माजी मंत्री आणि तीन माजी आमदारांनी घेतला. यापार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवून दिले आहेत. इतरही काही पदाधिकारी शनिवारी त्यांचे राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी अजित पवार गटाने माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ. सतीश पाटील, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, विधान परिषदेचे माजी सदस्य दिलीप सोनवणे, जळगाव जिल्हा बँकेच्या माजी संचालक तिलोत्तमा पाटील यांना शनिवारी दुपारी पक्षाध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश देण्याचे निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने संबंधित सर्व मातब्बरांचे समर्थक पदाधिकारी व निवडक कार्यकर्ते शुक्रवारी मुंबईकडे रवाना झाले.

दरम्यान, शरद पवार गटाचे जळगावमधील युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने शरद पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे शुक्रवारी त्यांच्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पाठवून दिला. याशिवाय, जळगाव जिल्हा बँकेच्या माजी संचालक तथा शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस तथा नाशिक जिल्हा निरीक्षक तिलोत्तमा पाटील यांनी त्यांच्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवून दिला आहे.

तिलोत्तमा पाटील यांचे पुत्र वेदांशू पाटील यांनीही शरद पवार गट विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व धुळे जिल्हा निरीक्षक पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्याकडे पाठवला. याव्यतिरिक्त काही तालुकाध्यक्षांनी त्यांचे राजीनामे पक्षाच्या जळगाव जिल्हाध्यक्षांकडे पाठवले आहेत.