महापालिका आयुकताना नागरिकांकडून लवकरच निवेदन सादर करणार

नाशिक : महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नाशिकरोड परिसरात निकृष्ट पद्धतीने रस्त्यांचे डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे विभागात सुरु असलेल्या ५० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामांचे तातडीने त्रयस्थपणे परीक्षण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रोहन देशपांडे यांनी केली आहे.

नाशिकरोड विभागात सुमारे ५० कोटी रुपयांची रस्ते डांबरीकरणाची कामे महानगरपालिकेतर्फे मंजूर करण्यात आली. काही दिवसांपासून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली. बहुतेक ठिकाणी ‘बीएम’ आणि ‘एसी’ अशा प्रकारची कामे सुरु आहेत. ‘बीएम’ प्रकारात रस्त्याचे डांबरीकरण करत असताना बारीक खडी आणि डांबर यांच्या मिश्रणाचा कमीत कमी ५० मिलिमीटरचा थर देणे आणि नंतर ‘एसी’ म्हणजे गुळगुळीतपणा येण्यासाठी २५ मिलिमीटरचा वरचा थर देणे गरजेच असते. परंतु, सर्वसामान्य नागरिकांना या तांत्रिक गोष्टींची माहिती नसल्याने ठेकेदार परस्पर काम उरकून मोकळा होतो, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.

आरंभ महाविद्यालयाजवळ रस्त्याचे काम सुरु असताना अध्र्या इंचापेक्षा कमी थर दिसून आला. हाताने आणि पायाने उखडल्यावरदेखील डांबरीकरण किती वरवरचे आहे, ते सहजपणे कळून येत होते. अशा परिस्थितीत तेथील मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गांगुर्डे यांनी महानगरपालिकेतील बांधकाम अधिकाऱ्यांना धारेवर धरले. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी बोलून खरी परिस्थिती समोर आणली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महानगरपालिकेचे अभियंता निलेश साळी आणि डोंगरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती बघितल्यावर तेथील काम तातडीने पुन्हा सुरु करण्यात आले. परिसरातील रस्ता डांबरीकरण कामांची पाहणी करण्यासाठी संबंधित तज्ज्ञांना पाचारण करून ‘मेरी’ किंवा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नागरिकांच्या उपस्थितीत सखोल तपासणी करण्याची मागणी देशपांडे यांनी केली. महापालिका आयुक्तांना लवकरच नागरिकांतर्फे निवेदन देण्यात येणार असल्याचेही देशपांडे यांनी नमूद केले.