नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील सेवा रस्त्यावर अज्ञात लुटारूंनी सराफी व्यावसायिकाचे अपहरण करून, त्याला मारहाण करत त्याच्याकडील रोकड, सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर चावी घेऊन दुकानातील ७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. लुटारूंनी पाळत ठेवून ही लूट केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रणावरून संशयितांचा शोध सुरू आहे. या संदर्भात संजय बेरा या व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेरा यांचे अंबड येथे सराफी दुकान आहे. दुकानातून दुपारी मुंबई नाक्याकडे दुचाकीवरून निघाले होते. या वेळी सेवा रस्त्यावर दुचाकीने आलेल्या तिघांनी त्यांना रोखले. एक संशयित त्यांच्या दुचाकीवर बसला. जिवे मारण्याची धमकी देऊन बेरा यांना स्वराज्यनगर येथील दाट झाडीत नेले. तिथे तलवारीच्या दांडय़ाने मारहाण करीत ९० हजार रुपयांची रोकड, तीन ग्रॅम सोन्याचे मणी, १७ ग्रॅमची चेन, साडेसहा ग्रॅमचे मंगळसूत्र, सोन्याच्या चार वाटय़ा असे सुमारे ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि भ्रमणध्वनी काढून घेतला. नंतर त्यांच्याकडील दुकानाच्या चाव्या हिसकावल्या. दोन संशयितांनी व्यावसायिकाला तिथेच बसवून ठेवले. अन्य संशयित चाव्या घेऊन दुकानात गेला. दुकानातून सोन्याची मुरणी, ओम पान, अंगठय़ा, कानातले, सोन्याचे मणी असे सुमारे ७२.५ ग्रॅमचे दागिने घेऊन आले. नंतर संशयित पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. एकूण चार लाख सात हजार रुपयांची रोकड व ऐवज लूटण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. तक्रारदाराकडून संशयितांचे वर्णन घेण्यात आले आहे. व्यावसायिकाला संशयित जिथून घेऊन गेले, त्या परिसरातील सीसी टीव्ही चित्रण मिळविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईणकर यांनी दिली. संशयित हे अंबड वा आसपासच्या भागातीलअसल्याचा अंदाज आहे.