आमचे आमदार, पदाधिकारी फुटून भाजपमध्ये गेले. त्याचा दोष भाजपला देणार नाही. ती त्या कार्यकर्त्यांची चूक आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाजवादी पक्षाची अवस्था ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी झाल्याची कबुली देतानाच आमचा पक्ष भाजपमध्ये कधीही विलीन केला जाणार नाही, असा दावा ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला.

नाशिक पश्चिम मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ जानकर यांच्या उपस्थितीत मोटारसायकल फेरी काढण्यात आली. या ठिकाणी सेनेच्या बंडखोरीमुळे भाजपने सर्व नेत्यांना प्रचारार्थ धाडण्यावर भर दिला आहे. दुचाकी फेरीत सहभागी झाल्यानंतर जानकर यांनी भाजप कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

विधानसभा निवडणुकीत रासपच्या वाटय़ाला केवळ एक जागा आली. त्यावर आपण समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी रासपला दोन जागा मिळाल्या होत्या.

या जागांवर पक्षाला उमेदवार देता आले नाही. तो दोष आमच्या कार्यकर्त्यांचा आहे. शेवटच्या तासाला आमच्या आमदारासह पदाधिकाऱ्याने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना रासपने काढून टाकले. वेळेवर असे घडल्यामुळे काय करणार? असा सवालही जानकर यांनी केला.

भाजपच्या महालासमोर रासपच्या झोपडीचे स्वतंत्र अस्तित्व राहावे, अशी अपेक्षा असल्याचे सांगून जानकर म्हणाले, स्वतंत्रपणे अस्तित्व ठेवताना रासप भाजपमध्ये विलीन करावा, असा कोणी दबाव टाकला नाही. १४ राज्यांत रासपचे अस्तित्व आहे.  प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करायचा असतो. आमचे आमदार फुटले असले तरी रासप महायुतीत आहे.

‘सेना बंडखोरांना पाठीशी घालणार नाही’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक पश्चिमसह राज्यात दोन-तीन मतदारसंघांत महायुतीतील पक्ष परस्परांना आव्हान देत आहेत. उर्वरित मतदारसंघांत महायुतीतील वरिष्ठ नेते एकत्रितपणे हा प्रश्न सोडवतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेते, हा प्रश्न सोडवत आहे. मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांवर कारवाईचा इशारा दिला आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनीदेखील बंडखोरांना पाठीशी घालणार नसल्याचे संकेत दिले आहेत. काहीही झाले तरी राज्यात महायुतीला कौल मिळणार आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांनी बंडखोरी केली. आपण इथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आलो आहेत. त्यामुळे सेना नेत्यांनी सानपांची भेट घेतली असली तरी आपण मात्र त्यांना भेटणार नसल्याचे जानकर म्हणाले.