मालेगाव : मुस्लिम बहुल व संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या मालेगाव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यात स्वतःला झोकून देणारे ७८ वर्षीय बन्शीभाऊ कांकरिया यांचा उत्साह खरोखर वाखाणण्याजोगा आहे. वय वर्षे १२ असताना कांकरिया यांनी संघ शाखेत पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. संघाबरोबरची त्यांची ही नाळ उत्तरोत्तर घट्ट होत गेली. संघाची विचारधारा नसानसांत आणि ठासून भिनलेले बन्सीभाऊ यांच्या दृष्टीने संघ कार्य हे ईश्वरी कार्य होय,अशी धारणा झालेली आहे.

बन्शीभाऊ यांचे वडील पारसमल कांकरिया यांच्यावर संघाचा लहानपणापासून पगडा होता. १९६० मध्ये व्यवसायानिमित्त ते कुटुंबासह मालेगावहून कोलकोत्याला काही काळासाठी गेले होते. तेथेही ते नित्यनेमाने संघ शाखेत जात असत. वडिलांना कोलकाता येथे काही काळासाठी स्थायिक व्हावे लागल्यामुळे सहावीपर्यंत मालेगावी मराठी माध्यमात शिक्षण घेतलेल्या बन्सीभाऊ यांना सातवीच्या इयत्तेत कोलकोत्याच्या हिंदी माध्यमाच्या शाळेत दाखल व्हावे लागले. त्याकाळी जळगावचे केशव दीक्षित हे बंगाल प्रांतात संघ प्रचारक म्हणून कार्यरत होते.

बन्शीभाऊ यांच्या वडिलांच्या घरी दीक्षित यांचे नेहमी येणे-जाणे असायचे. यामुळे संघाच्या विचारधारेचे संस्कार बन्सीभाऊंवर आपसूक होत गेले. त्यातून गोडी निर्माण झाल्याने घराशेजारी असलेल्या संघ शाखेत ते नियमितपणे जाऊ लागले. त्यावेळी बन्शीभाऊ यांचे वय अवघे १२ वर्षे होते. तीन वर्षे कोलकोता येथे काढल्यावर कांकरिया कुटुंब मालेगावी परतले. मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण काकाणी शाळेत पूर्ण केल्यावर बन्सीभाऊ यांनी पुण्यातून स्थापत्य अभियंता पदवी प्राप्त केली. पुढे नाशिक येथे काही दिवस खाजगी नोकरी केल्यावर मालेगाव येथे त्यांनी स्वतःच्या बांधकाम व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांनी चांगला जम बसविला.

१९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली गेली आणि संघाशी संबंधित अनेक नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. या घटनांमुळे बन्सीभाऊ अत्यंत व्यथित झाले. पुढे जनता पक्षाची राजवट आली आणि संघावरची बंदी उठविण्यात आली. याच दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात संघ प्रचारक असलेले बाळासाहेब गौरवकर यांच्याशी मालेगाव येथील एका लग्न समारंभात त्यांची भेट झाली. गौरवकर हे एका सहकारी बँकेत नोकरीस होते.

केवळ संघ शाखेत जाण्यामुळे आणीबाणी काळात त्यांना २० महिने तुरुंगात खितपत पडावे लागले होते. त्यानंतर बँकेची नोकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संघाच्या कार्यात झोकून दिले. गौरवकर यांच्या तोंडून ऐकलेला हा घटनाक्रम बन्सीभाऊ यांच्या मनावर खोलवर परिणाम करून गेला. आपणही संघ कार्यात असेच वाहून घ्यावे, असा निश्चय मग त्यांनी केला. बन्शीभाऊ यांच्या कामाचा झपाटा व तळमळ बघून संघटनेतील मालेगाव शहर सहकार्यवाह,कार्यवाह, तालुका संघचालक, नाशिक जिल्हा सहसंघसंचालक व संघचालक अशी चढत्या कमानीची एकेक जबाबदारी त्यांच्या शिरावर येऊन पडली.

या जबाबदारीनुसार १०० टक्के योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बन्सीभाऊ यांनी केला. मालेगावचे संघचालक असताना १९८३ मध्ये बन्शीभाऊ यांनी सरसंचालक बाळासाहेब देवरस यांची मालेगावला सभा आयोजित केली होती. यानिमित्ताने बाळासाहेब यांचा मालेगावात तीन दिवस मुक्काम होता. ही सभा तेव्हा चांगलीच गाजली होती, अशी आठवण बन्शीभाऊ सांगतात. संघ कार्यात हिरीरिने सहभाग राहिला असला तरी प्रत्यक्ष राजकारणापासून मात्र दूरच रहाणे त्यांनी पसंत केले. मालेगाव मर्चंट बँक या सहकारी बँकेत दोन टर्म संचालक म्हणून त्यांनी काम बघितले. निहाल अहमद यांच्यासारख्या तगड्या समाजवादी नेत्याविरोधात मालेगावातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी गळ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना एकदा घातली होती. मात्र त्यांनी त्यास नकार दिला.

बागलाणच्या पश्चिम पट्टयातील आदिवासींचे धर्मपरिवर्तन करण्यासाठी मिशनरींकडून एकेकाळी मोठे प्रयत्न केले गेले होते. हे धर्मांतर रोखण्याच्या कामात बन्शीभाऊ आघाडीवर राहिले. आदिवासी भागात आरोग्य सुविधा, संसारोपयोगी वस्तूंचे वाटप आणि वनवासी कल्याण आश्रमासाठी आर्थिक मदत करण्यासाठी त्यांचा सदैव पुढाकार राहिला. ७८ वर्षं वय झाले असले तरी पूर्वीच्याच उत्साहात ते आताही दररोज संघ शाखेत जात असतात. तसेच संघातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रम व प्रत्येक कार्यक्रमांमध्ये देखील त्यांचा सहभाग असतो. संघातर्फे केल्या जाणाऱ्या संचलनात ते आवर्जून सामिल होत असतात. विजयादशमीच्या निमित्ताने गुरुवारी काकाणी शाळेपासून संघातर्फे पारंपरिक पद्धतीने शहरात संचलन करण्यात आले. यातही त्यांचा सहभाग होता.