नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षित स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजता होणार आहे. संघाच्या पश्चिम क्षेत्राचा कार्यकर्ता विकास वर्ग– प्रथम (सामान्य) वर्ग येथे सुरु आहे. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यातून आलेल्या २८५ स्वयंसेवकांचे सघोष संचलन विद्याप्रबोधिनी शाळा (भोंसला) येथून प्रारंभ होईल.

संघ रचनेतील विदर्भ, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गुजरात आणि सौराष्ट्र अशा सहा प्रांतातील स्वयंसेवकांचा प्रशिक्षणात सहभाग आहे. यामध्ये शेतकरी, लघुउद्योजक, डॉक्टर, वकील, व्यापारी, शिक्षक आदिंसह उच्च महविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. देशभक्ती, शारीरिक व बौध्दिक विषयाचे या संघ शिक्षा वर्गात स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाते. मंगळवारी सायंकाळी वर्गाचे सर्वाधिकारी विष्णू वझे, कार्यवाह जयदीप धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत प्रशालेच्या मैदानावर संघ शिक्षा वर्गातील स्वयंसेवकांचे संपूर्ण गणवेशातील संचलन होणार आहे. या निमित्ताने शहरवासियांना संघ शिक्षा वर्गात स्वयंसेवकांना दिले जाणारे प्रशिक्षणाची चुणूक पहायला मिळणार आहे. संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पथ संचलनाचा मार्ग

विद्या प्रबोधिनी शाळा(भोंसला)-नंदन स्वीट्स- शहीद चौक- प्रसाद चौक- आकाशवाणी भाजी बाजार- मधुर स्वीट्स- भोसला प्रवेशद्वार- विद्या प्रबोधिनी शाळा (भोंसला) असा संचलनाचा मार्ग असणार आहे.