नाशिक – ग्रामीण पोलिसांनी त्र्यंबकेश्वर येथे एका कंटेनरमधून ८७ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुटखा विरोधी अभियान सुरू केले आहे. अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील पानटपऱ्या, गोदाम आदींची तपासणी केली जात आहे.
पोलिसांनी दिल्लीहून निघालेला कंटेनर मोखाडामार्गे भिवंडीकडे जात असताना पकडला. या कंटेनरमधून ८७ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ दिवसांत ग्रामीण पोलिसांनी गुटख्याची साठवणूक, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध ८८ गुन्हे दाखल केले असून एक कोटी, ३२ लाख, ५४ हजार, ४८३ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ९० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा – नाशिक : पाच घरफोडींमुळे दहिवाळ हादरले; १५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास
नागरिकांनी गुटखा, पान मसाला तसेच इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविषयी काही माहिती असल्यास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या मदतवाहिनी क्रमांक ६२६२२५६३६३ यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.