नाशिक – शिवशाहीत मराठा सैन्याने मुघलांविरुद्ध खुल्या मैदानात जिंकलेल्या पहिल्या लढाईचा साक्षीदार राहिलेल्या ‘साल्हेर’चा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्यानंतर पुरातत्व विभागाने आता या किल्ल्याच्या राखीव क्षेत्रातील (बफर झोन) मुल्हेर, मोरागड, हरगड, न्हावीगड, भिलाई हे पाच किल्ले आणि मांगीतुंगी संरक्षित करून या स्थळांचे जतन, संवर्धन करण्याचे निश्चित केले आहे. राज्यात सर्वाधिक ६८ किल्ले नाशिक जिल्ह्यात आहेत. यामध्ये भुईकोटपेक्षा अधिक दुर्गगड आहेत. त्यांनाही आता महत्व प्राप्त झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत साल्हेर किल्ला स्वराज्यात दाखल झाला होता. मराठा सैन्याने मुघलांविरुद्ध खुल्या मैदानात जिंकलेली पहिली लढाई म्हणून ‘साल्हेरची लढाई’ प्रसिद्ध आहे. बागलाण तालुक्यातील साल्हेरला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन दिल्यामुळे या किल्ल्याचे जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन आदींची जबाबदारी वाढली आहे. डोलाबारी डोंगर रांगेत समुद्रसपाटीपासून ५१४१ फूट उंचीवर हा किल्ला आहे. त्याचे संपूर्ण व्यवस्थापन आता प्रशासनाकडे येईल. किल्ला परिसरात बांधकाम आणि विकास कामांवर निर्बंध येतील. महावारसा समितीने १० वर्षांच्या कालावधीसाठी तयार केलेल्या आराखड्यानुसार कार्यवाही होणार आहे.

पुढे काय होणार ?

दुर्ग संपदेला जागतिक ओळख मिळाल्याने पर्यटनास चालना मिळणार आहे. बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गांचा विकास केला जाईल. किल्ला परिसरात प्राथमिक विकास, रचना कशा असाव्यात, यावर काम होईल. जिल्हा परिषद वा अन्य यंत्रणांना या क्षेत्रात परस्पर कुठलीही विकास कामे करता येणार नाहीत.

किल्ल्यावर माहिती केंद्राची निर्मिती, माहिती व दिशादर्शक फलक लावले जातील. प्लास्टिक बंदीची कठोरपणे अंमलबजावणी होईल. काही धोक्याची ठिकाणे असल्यास पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तिथे काळजी घेतली जाईल. किल्ल्यावर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, वीज वितरणाची व्यवस्था केली जाईल. निर्बंध क्षेत्राबाहेर जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी पंचतारांकित हॉटेलऐवजी स्थानिक निवास व्यवस्था आणि ग्रामीण खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे नियोजन आहे. याबाबतची माहिती राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच किल्ल्यांचे संवर्धन

दुर्गम साल्हेरचे महत्व आसपासच्या पाठबळ देणाऱ्या किल्ल्यांमुळे वाढले. मराठ्यांच्या इतिहासात त्यांचे वेगळे महत्व आहे. पर्यटक साल्हेरबरोबर सभोवतालच्या किल्ल्यांनाही भेटी देतील. साल्हेरच्या राखीव क्षेत्रात मुल्हेर, मोरागड, हरगड, न्हावीगड, भिलाई या किल्ल्यांसह जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र मांगीतुंगीचाही समावेश होतो. त्यांचे जतन व संवर्धन करण्यात येणार आहे. मुल्हेर हा आधीपासून राज्य संरक्षित आहे. राखीव क्षेत्रातील अन्य चार किल्लेही त्या यादीत समाविष्ट होतील. राज्यात सर्वाधिक ६८ किल्ले एकट्या नाशिक जिल्ह्यात आहेत. यामध्ये भुईकोटपेक्षा दुर्ग किल्ल्यांची संख्या मोठी आहे. साल्हेरच्या राखीव क्षेत्रातील किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याचे पुरातत्व विभागाचे नियोजन असल्याचे सहायक संचालक अमोल गोटे यांनी नमूद केले.