नाशिक : आपल्या प्रत्येक भाषणात वादग्रस्त विधान करणारे श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी नाशिक येथील कार्यक्रमात पुन्हा एकदा असेच विधान करुन नवीन वाद ओढवून घेतला आहे. यावेळी त्यांनी देशाच्या सर्वधर्मसमभावावर टिकास्त्र सोडले. सर्वधर्मसमभाव म्हणजे नीचपणा, ढोंगीपणा आणि षंढपणा आहे. ध्वज म्हणजे देशाच्या एकात्मतेचे प्रतीक. भगव्या ध्वजाचा उल्लेख विद्वानांनी सूर्य आणि केतू केला आहे. त्यामुळेच छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी भगव्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष केला, आता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर १५ ऑगस्टला भगवा फडकविण्यासाठी एकसंघ व्हावे, असे आवाहनही संभाजी भिडे यांनी केले.
नाशिक येथील राणे नगरात श्री शिवप्रतिष्ठान नाशिक महानगराच्या वतीने सोमवारी सायंकाळी भिडे गुरूजी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी भिडे यांनी सर्वधर्मसमभावावर टीका केली. आपण सर्वधर्मसमभाव म्हणत असलो तरी हे हिंदू राष्ट्र आहे. आपण हिंदू राष्ट्रासाठी जगले पाहिजे. हिंदुस्तानच्या राष्ट्राची वाटचाल ९६ हजार वर्षांपासून आहे. यात उदंड परिवर्तने झाली. देश, देव, धर्म आणि हजारो वर्षांचा इतिहास साक्षी ठेऊन मी बोलतो. १७९४ ते १८०३ या काळात लाल किल्ल्यावर भगवा फडकवला गेला, असा इतिहास सांगतो. त्याचे भान ठेवा.
स्वराज्य अजिंक्य ठेवण्यासाठी सिंधू आणि सप्त नद्या यावर आपले वर्चस्व ठेवले पाहिजे. कारण अजूनही नद्यांच्या आजूबाजूचा परिसर परकीयांच्या ताब्यात असल्यासारखा दिसतो. सर्वच राज्ये आपली आहेत. परंतु, देशाच्या तोंडावर असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. कारण, या राज्यात शिवछत्रपतींच्या जीवनातील मोठे प्रसंग आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी संघर्ष करणारा, लढणारा समाज निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वारसा पुढे चालविण्यासाठी हिंदुस्तानशी असलेले नाते सोडता कामा नये, असे आवाहन भिडे यांनी केले.
यावेळी भिडे यांनी, मुस्लिम समाजावर टीका केली. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यातील युद्धमय आणि बुद्धिमय फरक त्यांनी सांगितला. ग्रहण काळात मंत्राचा जप केल्याने मंत्राची शक्ती प्राप्त होत असल्याचेही भिडे यांनी नमूद केले.
श्री शिवप्रतिष्ठान नाशिक महानगराच्या वतीने उभारलेल्या ५१ फुट उंच हिंदवी स्वराज्य स्तंभाचे अनावरण भिडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विविध आखाड्यांचे संत, महंत, धारकरी आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता.
आंबे खाल्ल्याने मूल होते या विधानाचा पुनरुच्चार
संभाजी भिडे यांनी काही वर्षांपूर्वी नाशिक येथील एका कार्यक्रमात एका बागेतील आंबे खाल्ल्यानंतर मुले होतात, असे विधान केले होते. सोमवारी सायंकाळी नाशिक येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात भिडे यांनी पुन्हा त्या विधानाचा पुनरुच्चार केला.