शिंदे गटात लवकरच स्फोट होईल, असं मोठं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत हे कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच शिंदे गटात गेलेल्या आमदार-खासदारांनी पुन्हा निवडून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा…”, अजित पवारांचं मनसेप्रमुखांवर टीकास्र, ‘त्या’ मुलाखतीचाही केला उल्लेख!

काय म्हणाले संजय राऊत?

“काही आमदार सोडून गेले म्हणून शिवसेना संपली, असं होत नाही. ४० नेते गेले तरी, पक्ष जमीनीवर आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी तुम्ही निवडणुका घेतल्या, तरी आम्ही जिंकून येऊ. महानगरपालिका असेल किंवा अन्य निवडणुका असतील या निवडणुका भीतीपोटी टाळल्या जात आहेत. शिवसेना नवीन चिन्हावरसुद्धा विजयी होईल, शिवसेनेला कुठेही तडा गेलेला नाही”, असेही ते म्हणाले.

“लोकांच्या मनात गद्दारांबद्दल चीड”

“नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातले जे खासदार-आमदार शिंदे गटात गेले आहेत, त्यांनी परत निवडून दाखवावे. खासदार गोडसे यांची राजकीय कारकीर्द संपली आहे. आम्ही सतत लोकांमध्ये फिरतो आहे. लोकांच्या मनात गद्दारांबद्दल चीड आहे. लोकं शिवसेनेच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. कालपासून मी नाशिकमध्ये आहे. येथे सर्वांना भेटतो आहे. लोकं त्यांना खोकेवाले बोलतात”, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – “शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी…”, शिंदे गटाचा खोचक टोला; कवितेतून ठाकरे गटालाही केलं लक्ष्य!

“शिंदे गटात लवकरच स्फोट होईल”

यावेळी पत्रकारांनी दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्यातील मदभेदाबाबत विचारले असता, “मी खासदार असलो, तरी त्यापूर्वी एक क्राईम रिपोर्टर आहे. माझा पिंड पत्रकाराचा आहे. त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे, ते मला चांगलं कळतं. शिंदे गटात काय सुरू आहे, हे मला माहिती आहे आणि लवकरच त्याचा स्फोट होईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर…”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा

“राणेंच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही”

दरम्यान, भाजपा नेते नारायण राणे यांनी संजय राऊत हे आता सामनाचे संपादक नाही तर सहसंपादक आहेत, असा टोला लगावला होता. त्यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. “त्यांचे डोक ठिकाणावर नाही. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मी ‘सामना’मध्ये ज्या पदावर होतो, त्याच पदावर आहे. मी तुरुंगात असतानाही त्याच पदावर होतो”, असे ते म्हणाले.

”ही गद्दारी त्यांना शांतपणे जगू देणार नाही”

जे आमदार खासदार शिवसेना सोडून गेले त्यांच्या कपाळावर ‘गद्दार’ असा शिक्का बसला आहे. ज्याप्रकारे दिवार सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’, असे लिहिले होते, उद्या ह्यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना लोकं गद्दारांची नातेवाईक म्हणतील, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. या आमदारांच्या कपाळावर गद्दार हे शब्द कोरले गेले आहेत. त्यांच्या पिढ्यांपिढ्यांना ही गद्दारी आता शांतपणे जगू देणार नाही, असेही ते म्हणाले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticized shinde government in nashik press conference spb
First published on: 02-12-2022 at 12:57 IST