नाशिक : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) संबंध कसे आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. अमित शाह यांच्यावर टीका करण्याची एकही संधी उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे सोडत नाहीत. आणि मुंबईत अमित शाह यांचा दौरा असतो, त्यावेळी तेही उध्दव ठाकरे यांना फटकारल्याशिवाय राहत नाहीत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजप आणि ठाकरे गट दोन्ही बाजूंकडून टिकेला धार चढण्याची शक्यता आहे. असे असताना नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे अमित शाह यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने आणि खासदार राऊत यांनीही त्यांना अमित शाह यांच्याशी भेटीसाठी वेळ घेण्याचे आश्वासन दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर, सध्या विरोधी पक्षांकडून वेगवेगळ्या विषयांवर आंदोलने केली जात आहेत. सत्ताधाऱ्यांकडूनही त्यांना उत्तर दिले जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नुकतेच नाशिक येथे आले होते. यावेळी ठाकरे गटाचे निफाड तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील यांनी नितीन निकम, किरण वाघ, योगेश आढाव यांच्यासह राऊत यांची भेट घेतली. नाशिक जिल्ह्यातील निफाड सहकारी साखर कारखाना आणि रानवड साखर कारखाना हे एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात उच्च दर्जाच्या कामगिरीसाठी प्रसिध्द होते. परंतु, दिवस पालटले आणि या दोन्ही कारखान्यांचे वैभव लयास गेले. नाशिक जिल्हा बँकेने निफाड कारखाना विक्रीचा घातलेला घाट उधळून लावण्यासाठी सभासद आणि कामगार आक्रमक झाले होते. नुकताच त्यासंदर्भात मोर्चाही काढण्यात आला होता.

खासदार संजय राऊत यांना निफाड साखर कारखाना आणि रानवड साखर कारखान्यांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची माहिती देत माजी आमदार अनिल कदम यांच्यावतीने शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील यांनी निवेदन दिले. रानवड कारखाना निफाडचे राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार दिलीप बनकर यांच्या पतसंस्थेने अजित पवार यांच्या राजाश्रयाने चालविण्यास घेतला होता. मात्र आमदार दिलीप बनकर यांनी गाळप हंगाम बंद ठेवून ऊस उत्पादक आणि कामगारांचे नुकसान केले. त्याहीपेक्षा त्या कारखान्याच्या भाड्यापोटी थकलेले १२ कोटी रुपये अवसायक यांच्याकडे न भरता सत्तेचा दुरुपयोग करून साखर कारखान्याची फेरनिविदा काढण्यात आली. या कारखान्यातून अंदाजे पाच कोटी रुपयांच्या भंगाराची विल्हेवाट लावण्यात आली असून प्रचंड गैरव्यवहार करण्यात आला आहे. याची केंद्रिय यंत्रणाकडून चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी खंडू बोडके पाटील यांनी संजय राऊत यांच्याकडे केली आहे.

रानवड साखर कारखान्याकडे अनेकांचे पैसे येणे असल्याने सर्व पैसे वसूल करून तो कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने संजय राऊत यांच्याकडे केली. या दोन्ही कारखान्यांच्या उर्जितावस्थेसाठी शेवटचा प्रयत्न म्हणून केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी भेट घडवून देण्याची विनंती संजय राऊत यांच्याकडे केली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी निसाका आणि रासाका या दोन्ही कारखान्यांविषयी सर्व वस्तुस्थिती जाणून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा करून बैठकीसाठी वेळ घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी..जी. सूर्यवंशी, नितीन निकम, किरण वाघ, योगेश आढाव उपस्थित होते.