नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एनएमआरडीएने राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांकडे जिल्ह्यातील छगन भुजबळ, ॲड. माणिकरा कोकाटे, नरहरी झिरवळ आणि दादा भुसे या चारही मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याची भावना आ. हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली होती.
या स्थितीत आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार सीमा हिरे यांनी एनएमआरडीएच्या विरोधात साखळी उपोषण करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली. अतिक्रमण निर्मूलन मोहीम कायमस्वरूपी थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे रुंदीकरण केले जाणार आहे. या अनुषंगाने एनएमआरडीएने ऐन दिवाळीत या रस्त्यालगतची बांधकामे, दुकानांवर कारवाई सुरू केली होती. या विरोधात कैलास खांडबहाले यांच्या नेतृत्वाखाली राजाभाऊ सारस्कर, शिवाजी बाहुले, भाऊसाहेब खांडबहाले, सोमनाथ खांडबहाले आदींनी महिरावणी येथे आंदोलन सुरू केले. आ. हिरामण खोसकर आणि सरोज अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागून या कारवाईस तात्पुरती स्थगिती मिळवली. काही दिवसांपासून हा विषय गाजत आहे. साधू-महंतही नागरिकांच्या पाठिशी उभे राहिले. परंतु, स्थानिक मंत्र्यांनी या प्रश्नाची दखल घेतली नसल्याची खंत आ. खोसकर यांनी व्यक्त केली होती.
जिल्ह्यात आदिवासी समाजाचा एक, मराठा समाजाचे दोन, माळी समाजाचा एक असे एकूण चार मंत्री आहेत. लोक रस्त्यावर उतरले असताना मंत्र्यांना दयामाया आली नाही. साधू-महंतांना जेे कळते, ते या मंत्र्यांना कळत नाही. पुढील काळातही संबंधित मंत्र्यांनी संपर्क साधला नाही. उलट कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे मदतीला धाऊन आल्याचे खोसकर यांनी नमूद केले.
नाशिकचे मंत्री फिरकले नसताना भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी सातपूर, पिंपळगाव बहुला, पेगलवाडी, महिरावणीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एनएमआरडीए विरोधात सुरू केलेल्या साखळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. एनएमआरडीएकडून अतिक्रमणच्या नावाखाली नाशिक -त्र्यंबकेश्वर रस्त्यालगतची घरे, दुकाने पाडण्याची कारवाई निषेधार्ह आहे. ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करणार असल्याची ग्वाही आमदार हिरे यांनी आंदोलकांना दिली. एनएमआरडीएच्या मोहिमेमुळे ग्रामस्थांमध्ये रोष आहे. एनएमआरडीएची अतिक्रमण निर्मूलन मोहीम कायमस्वरुपी थांबबावी, यासाठी आग्रह धरला जाईल, असे आ. हिरे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे पदाधिकारी महेश हिरे उपस्थित होते.
