जळगाव : मुंबईतील प्रतिष्ठित काला घोडा महोत्सवासाठी शहरातील परिवर्तन संस्था निर्मित अमृता साहिर इमरोज या नाटकाची निवड करण्यात आली आहे. हा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. जळगावच्या हौशी रंगभूमीवरील नाटकाची प्रथमच या महोत्सवासाठी निवड झाली आहे.

काला घोडा महोत्सव हा जगभरात प्रसिद्ध असून, साहित्य, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य अशा विविध कलांनी समृद्ध असलेला हा महोत्सव आहे. महोत्सवात परिवर्तन संस्थानिर्मित अमृता साहिर इमरोज या नाटकाची निवड करण्यात आली आहे. हे नाटक सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये या नाटकाचे प्रयोग झाले आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील लिखित या नाटकाचे दिग्दर्शन मंजूषा भिडे यांनी केले असून, निर्मितीप्रमुख नारायण बाविस्कर, हर्षल पाटील आहेत. तांत्रिक बाजू राहुल निंबाळकर आणि मंगेश कुलकर्णी यांनी सांभाळली आहे.

हेही वाचा >>> नाशिक : चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचे तत्व पाळले, प्रशांत दामले यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाटकात जयश्री पाटील, हर्षदा कोल्हटकर आणि शंभू पाटील यांच्या भूमिका आहेत. भारतातील श्रेष्ठ पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित हे नाटक अनेक पातळ्यांवर समकालीन अनेक गोष्टींचा शोध घेते. यामुळेच मराठी रंगभूमीवरचा हा आगळावेगळा प्रयोग म्हणून नाट्यकर्मी या नाटकाकडे पाहत आहेत. या नाटकाचे भाषांतर रवी मिश्रा यांनी केले आहे. काला घोडा महोत्सवात सहा फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात अमृता साहिर इमरोजचा प्रयोग होईल. खानदेशच्या रंगभूमीचा हा सन्मान असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे.