धुळे: मुलीची छेड काढल्याच्या संशयाने सातत्याने मानसिक, शारीरिक छळ होत असल्याने वैतागून एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने ब्राह्मणे (ता.शिंदखेडा) गावच्या तत्कालीन पोलीस पाटलासह तिघांना प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी बुधवारी निकाल दिला. भिला भिल, चंदर भिल आणि तत्कालीन पोलीस पाटील प्रवीण पाटील अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे येथे ११ फेब्रुवारी २०१७ रोजी आसाराम भिल, मोठाभाऊ उर्फ विनोद भिल आणि शिवदास भिल यांनी रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली होती. आपल्या कुटुंबात आता कुणीही पुरुष जिवंत राहिले नसल्याची भावना झाल्याने आसाराम यांची पत्नी विठाबाई आणि मुलगी वैशाली यांनीही नंतर एका कोरड्या विहिरीत उडी घेतली. या घटनेत वैशालीचे प्राण वाचले. परंतु, विठाबाई यांचा मृत्यू झाला. वैशाली भिल यांनी दिलेल्या जबाबावरून नरडाणा पोलीस ठाण्यात भिला भिल,चंदर भिल आणि तत्कालीन पोलीस पाटील प्रवीण पाटील यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आसाराम भिल यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिट्ठीत म्हटल्यानुसार मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून भिला भिल यांच्यासह तिघांनी आसाराम यांच्या कुटुंबाचा सतत शारीरीक व मानसिकक छळ सुरु केला होता. आसाराम यास गाठून संशयितांनी ‘रात्रीतून गांव सोडून निघून जा किंवा जीव दे. पुन्हा गावात दिसला,तर तुला परिवारासह ठार मारू ‘ अशी धमकी दिल्याने अखेर या भयभीत कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप आहे.तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान हरीभाऊ माथुरे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. संशयितांविरुद्ध न्यायालयांत आरोपपत्र दाखल करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या खटल्याचे कामकाज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्यासमोर चालले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील निलेश कलाल यांनी सात जणांच्या महत्वपुर्ण साक्ष न्यायालयासमोर नोंदवून घेतल्या. अतिरिक्त सरकारी वकील कलाल यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्या. आनंद यांनी उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर तीनही संशयितांना प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यांस संशयितांना एक महिन्याचा अधिक सश्रम कारावास भोगायचा आहे. जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. कलाल यांनी युक्तिवाद केला. त्यांना पोलीस विभागातील पैरवी अधिकारी स्मित चव्हाण, निरंजन साळुंखे , विजय जडे यांचे सहकार्य लाभले.