जळगाव : पुण्यातील रेव्ह पार्टीतून राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. प्रांजल हे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. या प्रकरणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली असून, पोलीस तपासातून खरे काय ते बाहेर येईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणे किंवा भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
खराडीमधील एका गृहनिर्माण संकुलात मध्यरात्रीच्या सुमारास प्रांजल खेवलकर आपल्या काही मित्रांसोबत पार्टी करत होते. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता, तिथे मद्यासह गांजा आणि हुक्क्याचा साठा आढळून आला. या कारवाईत प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पार्टीत अंमली पदार्थांचा वापर झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सदरची कारवाई एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर झाल्याने विरोधकांकडून खडसे यांना आता लक्ष्य करण्यात आले आहे. विशेषतः मंत्री गिरीश महाजन यांनी जावयावरील कारवाईचे निमित्त साधून खडसे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.
खडसे यांनी शनिवारी जळगावमधील पत्रकार परिषदेत चाळीसगाव शहरातच अंमली पदार्थ कसे काय पकडले जातात म्हणून आक्षेप घेतला होता. आता त्यांचे जावई स्वतः रेव्ह पार्टीसारखे सगळे उद्योग करत असल्याचे पोलीस कारवाईतून समोर आले आहे. हा सर्व विषय पोलीस तपासाचा आहे. तपासातून नेमके काय घडले ते समजणार आहे. पार्टीत अंमली पदार्थ, दारूच्या बाटल्या आणि हुक्का वगैरे सापडला.
त्याठिकाणी काही महिलाही उपस्थित होत्या, अशी माहिती मिळाल्याचा दावा मंत्री महाजन पत्रकारांशी बोलताना केला. खडसे यांना जर त्यांच्या जावयाला अडकविण्यात येणार असल्याचा आधीच संशय होता, तर त्यांनी जावयाला सावध करायला पाहिजे होते, असाही टोला महाजन यांनी हाणला आहे.
दुसरीकडे, या विषयावर आपली प्रतिक्रिया देताना पुण्यातील पार्टी ही रेव्ह पार्टी होती की घरगुती स्वरूपाची, हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. तसेच, या पार्टीदरम्यान खरोखर अंमली पदार्थांचा वापर झाला होता की नाही, याची खात्री न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच होईल. त्यामुळे तोपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणे किंवा भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटल्यानुसार, आपल्या जावयाला आधीच सावध करण्याइतका मी त्यांच्यासारखा हुशार नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला.