नाशिक – आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीच्या (शरद पवार) वतीने रविवारी येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश, मतचोरी, पक्षाची पुढील वाटचाल या विषयांवर शिबिरात चर्चा केली जाणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची शिबिरास प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पंचवटीतील स्वामी नारायण कार्यालयात रविवारी सकाळी नऊ वाजता प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरुवात होईल. शिबिरात सकाळच्या सत्रात पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या महिलांचे प्रश्न आणि सरकारचे अपयश, प्रा. सुभाष वारे यांचे संविधान, लोकशाहीपुढील आव्हाने आणि त्यावरील उपाय या विषयावर मार्गदर्शन करतील. दुपार सत्रात मत चोरी आणि उपाय यावर प्रशांत जगताप, उत्तम जानकर, हिंदू – मुस्लिम ऐक्य परंपरा याविषयी पैंगबर शेख आणि जितेंद्र आव्हाड हे जातीयवादी, भ्रष्ट महायुती सरकार या विषयावर उपस्थितांशी संवाद साधतील. सायंकाळ सत्रात अनिल देशमुख हे विदर्भातील पक्ष संघटन, अशोक वानखेडे हे राष्ट्रीय राजकारण आणि सध्यस्थिती, खा. सुप्रिया सुळे या राष्ट्रीय राजकारण आणि इंडिया आघाडी, आ. जयंत पाटील हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारी याविषयी मार्गदर्शन करतील. शरद पवार हे पक्षाची वाटचाल आणि दिशा स्पष्ट करतील. रात्री ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे तुकाराम विरूध्द नथुराम -हरी कीर्तन होणार आहे.
१५ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता गोल्फ क्लब मैदान येथून आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणार आहे. संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा झाला पाहिजे , शेतमालाला व दुधाला हमीभाव मिळाला पाहिजेत, बोगस खत बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजेत, कांद्याचे निर्यात सुरुवात करावी व किमान दहा रुपये अनुदान द्यावे , भात नागली,वरही. या पिकांना योग्य बाजार भाव मिळावा , कृषी यंत्र सामग्री वरील जीएसटी रद्द मुक्त करावी तसेच कृषी सन्मान निधी किसान ३००० अनुदान मिळावे नि.सा.का.साखर कारखाना संदर्भात शासनाने त्वरित योग्य निर्णय घ्यावा, महिलांवर अत्याचार युवकांचे बेरोजगारी व कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न याकडे मोर्चाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात येणार आहे. मोर्चा मध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रभारी मा.आमदार सुनील भुसारा, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, शहर जिल्हाध्यक्ष गजानन (नाना) शेलार यांनी केले.