नाशिक – नाशिकला खड्डेमुक्त करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी शहरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी शिवसेनेला (एकनाथ शिंदे) अचानक जाग आली. युवा सेनेच्यावतीने मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यासाठी नाशिकला मुक्काम करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांस्तव त्यांचे नाशिकला येणे झाले. परंतु, खड्डेमय रस्त्यांची अवस्था काही बदललेली नाही. विरोधकांनी खड्ड्यांच्या प्रश्नावरून सातत्याने आंदोलने केली आहेत. महापालिका निवडणुकीत खड्ड्यांचा विषय सत्ताधाऱ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतो, हे लक्षात घेऊन भाजप आणि शिंदे गटाची धडपड सुरू आहे.

या संदर्भात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधींची उधळण अधिकारी वर्गाने केली. आजही संपूर्ण शहर खड्डेमय असल्याकडे लक्ष वेधले. यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधितांवर कारवाईचे संकेत दिल्यानंतर युवा सेनेचे योगेश बेलदार, रुपेश पालकर, दिगंबर नाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते महापालिकेत धडकले.

मनपा आयुक्तांच्या प्रवेशद्वाराबाहेर संबंधितांनी ठिय्या देत घोषणाबाजी केली. शहरातील सर्व रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी. शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिकांना होणारा धोका यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अनेक रस्त्यांची कामे काही महिन्यांपूर्वीच झाली होती.

निकृष्ट दर्जाच्या कामासाठी जबाबदार असलेले कंत्राटदार, अभियंते आणि अधिकारी यांची चौकशी करून फौजदारी कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवा सेनेने निवेदनाद्वारे केली. यावेळी शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या प्रतिमेला आंदोलकांनी जोडे मारले. खड्ड्यांची समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले न उचलल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. महानगरपालिका नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे खाते आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ते कारवाई करू शकतात. तसा इशाराही खुद्द त्यांनीच दिलेला आहे. असे असताना नाशिक महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची वेळ सत्ताधारी शिंदे गटावर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.