नाशिक : महायुतीत लोकसभेच्या नाशिकच्या जागेवरून चाललेला संघर्ष काहीसा शांत झाल्याचे दिसत असताना शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी ठाणे गाठल्याने तीनही पक्षात नव्याने चर्चेला उधाण आले. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवार म्हणून स्वीकारण्यास भाजप तयार नसल्याने त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी छगन भुजबळ यांचा सुचवलेला पर्याय अनेकांना रुचला नाही. त्यामुळे महायुतीने वादरहित नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केल्याने बोरस्ते यांच्या ठाणेवारीकडे त्यादृष्टीने पाहिले जात आहे.
महायुतीत नाशिकच्या जागेवरुन बेबनाव कायम आहे. शिंदे गट जागा सोडण्यास तयार नसताना भाजप आणि राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही आहे. नव्या वादरहित चेहऱ्याचा शोध सुरू झाल्याचे सांगितले जात होते. या स्पर्धेत आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव एकदम चर्चेत आले. आनंद दिघे फाउंडेशनतर्फे ठाण्यातील कोपरी येथे चैत्र नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कुटुंबिय या ठिकाणी नऊ दिवस उपस्थित असतात. येथील देवीच्या आरतीचा मान बोरस्ते यांना मिळाल्याने शुक्रवारी ते ठाण्याला गेले.
हेही वाचा…दिंडोरीत वंचितकडून ‘महाराष्ट्र केसरी’ मैदानात
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातून ४५ खासदार निवडून देण्याचे वचन पूर्ण होण्यास आशीर्वाद लाभू द्यावे आणि ४५ मधील एक खासदार नाशिकमधून धनुष्यबाणाच्या चिन्हातून जाऊ द्यावे, असे साकडे घातल्याचे बोरस्ते यांनी म्हटले आहे.