मालेगाव : राज्यात सध्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झालेली आहे. तसेच लवकरच पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना पक्षात भरती करण्याचा धडाकाच भाजपने लावल्याचे ठिकठिकाणचे चित्र आहे. आता मालेगावातही शिवसेना ठाकरे गटाला असाच धक्का देण्याची भाजपची तयारी आहे. माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे पुत्र तथा ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात मंगळवारी दुपारी हा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सतत पक्षांतर करणारा नेता म्हणून अद्वय हिरे यांची ख्याती आहे. २०१९ मध्ये दोन्ही काँग्रेस व शिवसेना या परस्परविरोधी विचारधारेच्या पक्षांची महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर स्थानिक पातळीवर अद्वय हिरे यांची कोंडी झाल्याचे बघावयास मिळाले. आघाडी धर्मामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आजवर ज्यांच्याशी दोन हात केले, त्या शिवसेनेच्या दादा भुसेंचे काम करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर येण्याची शक्यता निर्माण झाली. अशा स्थितीत हिरे हे राष्ट्रवादीत थांबणे शक्य नव्हते. त्यानुसार २०२१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ते विरोधी पक्ष असलेल्या भाजपात दाखल झाले. पुढे काही महिन्यांतच शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. भाजपच्या सोबतीने एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत आले. हिरे यांचे कट्टर विरोधक दादा भुसे हे शिंदे गटात सामील झाल्याने त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा मानाचे स्थान मिळाले. अद्वय हिरे यांच्यासाठी त्यामुळे भाजपमध्ये राहणे हे पुन्हा राजकीय दृष्ट्या अडचणीचे ठरले. भावी राजकारण सोयीचे व्हावे, या उद्देशाने मग त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

भुसे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाने अद्वय हिरे यांना हरप्रकारे बळ देण्याचा प्रयत्न केला. पक्षप्रवेश होताच खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मालेगाव येथे ठाकरे गटाचा भव्य मेळावा घेण्यात आला होता. पक्षाचे उपनेते म्हणूनही त्यांची नियुक्ती केली. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य मतदार संघात ठाकरे गटाने भुसे यांच्या विरोधात त्यांना रिंगणात उतरविले होते. अर्थात,या निवडणुकीत हिरे यांना भुसे यांच्याकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर अद्वय यांचा मतदार संघाशी फार संपर्क असल्याचे दिसून आले नाही. दरम्यानच्या काळात नाशिक येथून राजकारण करीत असलेले,अद्वय यांचे थोरले बंधू अपूर्व हिरे हे चार महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपवासी झाले. त्या पाठोपाठ अद्वय यांनी सुध्दा भाजपमध्ये प्रवेश करावा, यासाठी कुटुंबीयांकडून सारखे प्रयत्न केले जात आहेत, परंतु अद्वय यांच्याकडून नकारघंटा सुरु आहे,अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु होत्या. अखेरीस दोन दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या भेटीत अद्वय यांचा अचानकपणे भाजप प्रवेश नक्की झाला. त्यानुसार मंगळवारी दुपारी मुंबई येथे पक्ष कार्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे एकेकाळचे खंदे समर्थक व गेल्या विधानसभा निवडणुकीत भुसे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी करून कडवे आव्हान उभे करणारे बंडूकाका बच्छाव यांना भाजपमध्ये घेण्यासाठी याआधीच पक्षातर्फे आवतन देण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस मालेगाव येथे होणाऱ्या सोहळ्यात बच्छाव व त्यांच्या समर्थकांचा हा पक्ष प्रवेश होणार आहे. खुद्द बच्छाव तसेच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दोनच दिवसांपूर्वी ही पडद्यामागील बातमी माध्यमांकडे उघड केली. बच्छाव यांचा हा पक्ष प्रवेश राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय झाला असतानाच आता अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे. हिरे यांचे हे पक्षांतर ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.