जळगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरीच्या आरोपावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडले असताना, त्या वादात उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे बंधुंवर सडकून टीका केली आहे. तसेच नाचता येईना अंगण वाकडे, अशी त्यांची अवस्था झाल्याचा खोचक टोला त्यांनी दोघांना हाणला आहे.
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू असतानाच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मत चोरीच्या आरोपांवरून एकत्र भूमिका घेतली आहे. राहुल गांधींनी मत चोरीचे आरोप केल्यानंतर ठाकरे बंधुंनी त्यांच्या सुरात सूर मिसळले आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना आपल्या पक्षाची मते चोरली जात असल्याचा दावा केला. राहुल गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप करत मत चोरीचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या त्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली. मत चोरीच्या आरोपांची चौकशी झाल्यास १० ते १२ वर्षांचा खेळ उघड होईल, असेही वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचे सांगत सर्वांनी त्यावर बारकाईने लक्ष ठेवावे आणि आपल्या प्रभागांमध्ये मतदार याद्यांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केली. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राहूल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपाचे समर्थन करून केंद्रातील व राज्यातील सरकारवर निशाणा साधला आहे.
या विषयी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सर्वात आधी ठाकरे बंधुंच्या बेस्ट निवडणुकीतील पराभवाची खिल्ली उडवली. तुम्ही मराठी माणूस मराठी माणूस म्हणून एवढा कांगावा करतात. मग तुम्हाला कोणी मतदान केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तुम्हाला त्या निवडणुकीत कोणीच मतदान केले नाही. असे असताना, तुम्ही कधी मतदार याद्या, तर कधी मतपेट्या तर कधी बॅलेट युनिटबद्दल तक्रारी करतात. लोक तुम्हाला स्वीकारत नाही, त्यामुळे तुम्ही प्रत्येकी वेळी नवीन कारणे शोधतात. आता जर बेस्टची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली नसती, तर तुम्ही पुन्हा तेच बोलले असते. सर्व काही जनतेच्या हातात आहे. तुम्ही त्यांना सामोरे जा. आता पुढे महापालिकेच्या निवडणुका आहेत. कशाला रडत आहात, अशी टीका मंत्री महाजन यांनी केली. जळगावमधील चाळीसगाव तालुक्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
लोकसभेत तुमचे खासदार मोठ्या संख्येने निवडून आले. तेव्हा आम्ही रडत बसलो होतो का, आम्ही म्हटले होते का यांनी मत चोरी केली किंवा मत यंत्रात काड्या केल्या म्हणून. आम्ही रडत बसलो नाही. पुन्हा तयारीला लागलो आणि लोकांमध्ये गेलो. त्यामुळे तुमची ही अशी परिस्थिती झाली. आताही तुमचे रडगाणे पुन्हा सुरू झाले आहे. लोकसभेच्या मतदार याद्या विधानसभेच्या निवडणुकीत होत्या. कशासाठी रडत आहात तुम्ही, असाही सवाल मंत्री महाजन यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना उद्देशून केला. ही नाटके बंद करा. लोक तुम्हाला आता स्वीकारण्यास तयार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने पुढे चालला आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार आमच्या सोबत असून, आम्ही सगळे एकत्र काम करत आहोत. त्यामुळे देशाच्या आणि राज्याचा झपाट्याने विकास होत आहे, असा दावा मंत्री महाजन यांनी केला. भाजपविषयी एवढी बडबड करण्यापेक्षा लोकांमध्ये जा. तिथे काही बोला. कार्यकर्त्यांना कामाला लावा, असा सल्ला देखील त्यांनी ठाकरे बंधुंना दिला.