नाशिक – विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या परवाना नुतनीकरणासाठी शाळा नाहरकत दाखला जाणूनबुजून देत नसल्याने ही अट रद्द करण्यात यावी, स्पीड गव्हर्नर प्रमाणपत्र, रेडियमसाठी नवीन प्रमाणपत्र या अटी रद्द करण्याच्या मागण्यांसाठी सोमवारी शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

मोर्चाचे नेतृत्व वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र तथा नाशिक जिल्हाध्यक्ष अजिम सय्यद, संपर्कप्रमुख देवानंद बिरारी, ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड आदींनी केले. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात वाहतूक सेनेने भूमिका मांडली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने २०१६ मध्ये सुचविलेल्या कंपन्यांचे स्पीड गव्हर्नर वाहनधारकांनी बसविले. ते आजही कार्यरत असताना नव्या आदेशानुसार १६ अंकी स्पीड गव्हर्नर बसविण्यास सुचविण्यात आले आहे. हा वाहनधारकांवर अन्याय आहे.

याशिवाय नवीन नंबरपट्टी लावण्याची सक्ती, त्यासाठी आकारले जाणारे दर इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मागील वर्षी वाहनधारकांनी चांगल्या दर्जाच्या रेडिअमचा उपयोग केलेला असतानाही नवीन रेडिअम न लावता नवीन प्रमाणपत्राचे दर आकारण्यात येत आहेत. ते रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून नाशिकमध्ये येणाऱ्या वाहनांच्या तपासणीत अडथळा आणण्यात येतो. त्यांना त्याच दिवशी वाहनाच्या योग्यतेचे प्रमाणपत्र देण्यात यावे, चालक चरित्र पडताळणीविषयी प्रशासनाने सहकार्य करावे, आदी मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मोर्चात वाहतूक सेनेने आपली वाहने आणली होती. ही वाहने चालकांनी मिळेल त्या ठिकाणी उभी केली. सीडीओ मेरीपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयावर हा धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला इतर वाहनधारकांना तोंड द्यावे लागले.