Jalgaon Murder Case जळगाव – जिल्ह्यातील यावल शहरात बाबुजीपुरा परिसरात शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा वर्षीय मुलाचा मृतदेह शनिवारी शेजाऱ्यांच्या घरातील कोठीत संशयास्पदरित्या आढळून आला. ही धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. संतापलेल्या जमावाने संशयिताच्या दुकानावर तुफान दगडफेक केली. त्यानंतर परिसरातील दुकाने घाईघाईने बंद करण्यात आली.

ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी उद्भवलेल्या तणावाच्या परिस्थितीवर नियंत्रणात मिळविण्यासाठी पोलिसांकडून दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. बाबुजीपुरा परिसरातील रहिवासी मोहमंद हन्नान खान मजीद खान हा मजीद खान जनाब यांचा मुलगा शुक्रवारी सायंकाळी सुमारे सहा वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. सगळीकडे चौकशी केली. मात्र, त्याचा कुठेच तपास लागला नाही. शनिवारी सकाळपासून पुन्हा शोध सुरू केल्यावर अखेर त्याचा मृतदेह शेजारी राहणारे बिस्मिल्ला खलीफा यांच्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर एका कोठीत ११ वाजता संशयास्पदरित्या आढळून आला.

मुलाच्या धक्कादायक मृत्युची बातमी यावल शहरात वाऱ्यासारखी पसरली. अल्पावधीतच घटनास्थळी मोठ्या संख्येने जमाव एकत्र आला. तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हाजी शब्बीर खान, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे, शरद कोळी, सहायक पोलीस निरीक्षक अजय वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, एम. जे. शेख, अयाज खान यांच्यासह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठितांनी जमावास शांत करण्याचे प्रयत्न केले. मात्र, संतप्त नागरिकांनी मुख्य रस्त्यावरील बारी चौकाजवळील दुकानावर दगडफेक केली. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची दुकाने बंद ठेवली. परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून दंगा नियंत्रण पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले. न्याय वैद्यक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या घटनेनंतर यावल शहरात सध्या तणावपूर्ण वातावरण असून, बाबुजीपुरा भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.