शिवशाही बसची अवस्था

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाहेरून चकचकीत दिसणारी शिवशाही वातानुकूलित बस आतमध्ये धुळीने माखलेली, चालक कक्षाचा अंतर्गत दरवाजा सारखा उघडत असल्याने तो दोरीने ओढून धरण्याची  कसरत. नाशिक-औरंगाबाद मार्गावर धावणाऱ्या एका शिवशाही बसची ही अवस्था आहे.

कंत्राटदारांच्या बसवर खासगी चालक असून त्यांना अनेकदा जादा तास काम करावे लागते. यामुळे शिवशाहीचे अपघात वाढत असून प्रवाशांच्या जिवाचे मोल लक्षात घेऊन या चालकांचे कामाचे तास कमी करण्याची गरज व्यक्त होत आहे. परंतु, खासगी किंवा मंडळाच्या चालकांना जादा तास काम करावे लागत नसल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. शिवशाही बस प्रवासाची अनुभूती घेणारे प्रवासी रवींद्र अमृतकर यांनी या संदर्भात राज्य परिवहन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि नाशिक विभाग नियंत्रकांकडे तक्रार केली आहे.

अमृतकर हे इंटिग्रेटेड पॅसेंजर असोसिएशनचे सदस्य असून गुरुवारी त्यांनी नाशिक-औरंगाबाद शिवशाही बसने प्रवास केला. तेव्हा प्रवासातील भयावह वास्तव उघड झाले. राज्य परिवहन प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणार असेल आणि यामुळे भविष्यात अपघात होऊन प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास त्यास प्रशासकीय यंत्रणेवर कार्यवाहीची गरज त्यांनी व्यक्त केली. या बसच्या अपघातांची मालिका मोठी आहे. एक चालक विहित मुदतीपेक्षा जादा तास बस चालवत असल्याची तक्रार अमृतकर यांनी केली.

दीड हजार शिवशाही बस भाडेतत्त्वावर, तर ५०० बस मंडळाच्या मालकीच्या आहेत. कंत्राटदाराच्या बसवर वाहक मंडळाचा, तर चालक खासगी आहे. काही शिवशाही बस राज्य परिवहनच्या आहेत. त्यावर चालक, वाहक मंडळाचा आहे. राज्यात शिवशाही बसचे वर्षभरात २३० अपघात झाल्याची आकडेवारी आहे. शिवशाही बस पुरविणाऱ्या कंत्राटदारांनी परतीच्या प्रवासात नवीन चालक देण्याची सूचना केली होती. नियम न पाळणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा दिला होता. परंतु, त्याची कितपत अंमलबजावणी झाली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. मंडळ आपल्या चालकांना सुरक्षित वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येत आहे.

नाशिक-औरंगाबाद बसबाबतची तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली असून त्याची चौकशी केली जाणार आहे. त्यात कोणाची चूक आढळल्यास कारवाई केली जाईल. शिवशाही वा कोणत्याही प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनासाठी चालकाने आठ तास गाडी चालविणे अभिप्रेत आहे. आवश्यकता भासल्यास त्यात एक-दोन तास वाढ केली जाते. एसटी मंडळ आणि कंत्राटदाराच्या शिवशाहीला हा निकष लागू आहे. किमान आठ ते कमाल १० तासांव्यतिरिक्त कोणत्याही चालकाला जादा काम दिले जात नाही. कंत्राटदाराच्या चालकांची यादी मंडळाकडे आहे. त्यानुसार संबंधितांच्या चालकांची पडताळणी होत असते. यामुळे त्यांना जादा कालावधीसाठी बस चालवावी लागते यामध्ये तथ्य नाही.

– नितीन मैंद (विभाग नियंत्रक)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smiling from the outside dust inside location of shivshahi bus
First published on: 23-03-2019 at 00:33 IST