नाशिक : दंगल घडवून, तणावग्रस्त परिस्थिती निर्माण करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी काही घटक सक्रिय झाले असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडे आहे, असा दावा शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नाशिक दौऱ्यावर असलेले राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय जनता पक्षाला नैराश्य आले असून वैफल्याने ग्रासले आहे. यामुळे वेगवेगळय़ा लोकांना सुपाऱ्या देत महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केला. नव हिंदु ओवेसी आणि खरा ओवेसी एकत्र येऊन दंगल घडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या राज्यांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. दंगल घडवून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचे दाखवत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे कुटील कारस्थान आहे, याबाबत गुप्तचर विभागाकडे माहिती जमा झाली असल्याचा दावा त्यांनी केला.काहींनी हिंदुत्व भाडय़ाने घेतले आहे. आम्हाला हिंदुत्वाचे प्रदर्शन करण्याची गरज नाही. जनता अशा मुद्यांना लक्षात घेत नाही, हे उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीत स्पष्ट झाले आहे. भोंग्यांमागील आवाज कोणाचा हे जनता ओळखून आहे. महाविकास आघाडीला आव्हान देण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असा इशाराही राऊत यांनी दिला.आदित्य ठाकरे अयोध्या येथे जाणार असून त्या अनुषंगाने वेगवेगळय़ा कामांचे आयोजन करण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांनी मोठय़ा प्रमाणावर घोटाळा केलेला असतानाही त्यांना न्यायालयाकडून सातत्याने दिलासा दिला जात आहे. मीरा- भाईंदर महापालिकेत मोठय़ा प्रमाणात शौचालय घोटाळा झाला असून अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या शेजारी किरीट सोमय्या जातील, असा दावा त्यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2022 रोजी प्रकाशित
राज्यात दंगली घडविण्यासाठी काही घटक सक्रिय; संजय राऊत यांचा आरोप
दंगल घडवून, तणावग्रस्त परिस्थिती निर्माण करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी काही घटक सक्रिय झाले असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडे आहे, असा दावा शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 17-04-2022 at 00:02 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some elements active inciting riots state allegation sanjay raut ysh