लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील पाच वर्षे वयाखालील मुलांमधील न्यूमोनियाचे प्रमाण शून्यावर आणून बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने १२ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत सोशल अवरनेस ॲण्ड ॲक्शन टू न्यूट्रलाइज न्यूमोनिया (सांस) ही मोहीम न्यूमोनिया विरोधात जनजागृतीसाठी राबविण्यात येणार आहे.

आदिवासीबहुल त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ येथे बालमृत्युचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात वर्षभरात २३८ बालकांचा मृत्यू झाला. बालमृत्युत पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वरमध्ये घट तर, बागलाण, इगतपुरी, दिंडोरीत वाढ झाली आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. मागील वर्षी न्यूमोनियाने २१ मृत्यू झाले होते. त्यात नऊने घट होत हे प्रमाण १२ वर आले आहे. यंदा कमी वजनाची ४०, जंतुसंसर्ग १३, श्वास घेण्यास त्रास २५, जन्मत: व्यंग असलेली १२ आणि इतर आजारांमुळे १८ बालकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सांस मोहिमेच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-Chhagan Bhujbal: ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपाशी हातमिळवणी’, पुस्तकातील ‘त्या’ दाव्यावर छगन भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ या तालुक्यांमधील गरोदर मातांना शोधून त्या ज्या ठिकाणी राहतात, तेथील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांच्याकडून त्यांना आरोग्यसेवा घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात येईल. यामध्ये गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात वेळोवेळी तपासणी करणे, रक्ताची पातळी तपासणी, बाळाची वाढ व्यवस्थित होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आणणे, विशेष उपचाराची गरज असल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करणे, वेगवेगळ्या माता-शिशु शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, यासाठी सांसच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहेत. त्याकरिता आशा सेविकांना प्राथमिक आरोग्यविषयक शिक्षण देण्यात येणार आहे.