नाशिक : बांगलादेशनंतर भारतीय कांद्याचा सर्वात मोठा खरेदीदार असणाऱ्या श्रीलंकेने १० रुपये प्रति किलो असणारे आयात शुल्क आता ५० रुपयांपर्यंत वाढविले आहे. दरवर्षी स्थानिक कांदा बाजारात आल्यावर श्रीलंका सरकारकडून असा निर्णय घेतला जातो. दुसरीकडे बांगलादेशकडून थांबलेले परवाने देण्याचे काम एक-दोन दिवसांत सुरू होईल. देशांतर्गत बाजारात कांद्याची मागणी घटलेली असताना निर्यातीतील अस्थिरता स्थानिक बाजारावर परिणाम करीत आहे.

मागील पाच ते सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात मागणीअभावी कांद्याला अपेक्षित भाव मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वी बांगलादेशकडून कांद्यावरील निर्यात बंदी उठविली गेल्याने आशादायक चित्र निर्माण झाले होते. परंतु, तिथेही पूर्ण क्षमतेने कांदा पोहोचू शकला नाही. मालमोटारी बांगलादेशच्या सीमेवर पोहोचल्या. परंतु, मोजकेच परवाने मिळाल्याने संपूर्ण माल बांगलादेशमध्ये गेला नाही. सिमेवर अडकलेला कांदा खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे. बांगलादेशकडून परवाने देण्याची प्रक्रिया एक-दोन दिवसांत सुरळीत होण्याची अपेक्षा निर्यातदारांना आहे. या घटनाक्रमाने स्थानिक कांदा दरात फारशी सुधारणा झाली नाही. लासलगाव बाजारात सध्या २० ते २२ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. मागील सोमवारी क्विंटलचे सरासरी १६०० रुपयांवर असणारे दर यावेळी १५५१ रुपयांवर आले.

चार्तुमास, दक्षिणेकडील राज्यातील स्थानिक कांदा बाजारात आल्याने नाशिकच्या कांद्याची देशांतर्गत मागणी आधीच घटलेली असताना श्रीलंकेने कांदा व बटाट्यावरील आयात शुल्कात वाढ केल्याचे वृत्त समोर आले. भारतीय फलोत्पादन निर्यातदार संघटनेने त्यास दुजोरा दिला. ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेत स्थानिक कांदा बाजारात येतो. त्यामुळे दरवर्षी त्यांच्याक़डून एक ते दीड महिन्यांसाठी आयात शुल्क लावले जाते. तो माल संपुष्टात आल्यावर निर्यात पूर्ववत होते, याकडे निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी लक्ष वेधले. श्रीलंकेने बांगलादेशसारखी पूर्णत निर्यात बंदी केलेली नाही.

मंगळवारपासून प्रति किलो १० रुपयांवरील आयात शुल्क ५० रुपये आणि बटाट्यावरील ६० रुपये किलोवरील शुल्क ८० रुपयांवर नेले आहे. त्यामुळे काही प्रमाणात निर्यात होऊ शकते. तिकडे पावसात माल खराब झाल्यास भारतीय कांद्याची निर्यात पुन्हा पूर्वपदावर येईल, अशी आशा निर्यातदार बाळगून आहेत. या निर्णयाचा स्थानिक बाजारावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण, बांगलादेशनंतर भारतीय कांद्याचा श्रीलंका हा द्वितीय क्रमांकाचा खरेदीदार आहे. गतवर्षी एकूण कांदा निर्यातीत १३ टक्के कांदा श्रीलंकेत गेल्याची आकडेवारी आहे.