नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधांची सर्व कामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण व्हावीत, या पद्धतीने नियोजन करावे. विकास कामांसाठी भूसंपादन, रस्ते आदी वेळेत होणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत कुंभमेळा कालावधीत अर्धवट कामे राहणार नाहीत, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी दिले.
कुंभमेळ्यास जेमतेम दीड वर्षांचा कालावधी राहिला असून अद्याप विकास कामांनी वेग घेतलेला नाही. पावसाळा लांबल्याने कामे सुरू करता आली नाहीत. ऑक्टोबरमध्येही पाऊस राहिला. यंत्रणांनी विविध विकास कामांच्या निविदा प्रक्रिया अंतिम करीत कार्यारंभ आदेश दिले आहेत. नाशिक दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी कुंभमेळा कामांचा विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेतला. कुंभमेळ्यानिमित्त सुरू झालेल्या विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश दिले. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार (विशेष), विभागीय आयुक्त तथा नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते.
प्रयागराज येथील कुंभमेळ्यास झालेली गर्दी पाहता नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही भाविकांची वाढती संख्या राहणार आहे. त्यासाठी गर्दीचे सूक्ष्म नियोजन गरजेचे आहे. भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी जवळपासच्या मूलभूत सुविधांची माहिती ॲप, पोर्टल तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे कुंभमेळ्यापूर्वीच त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. भाविकांना वाहनतळापासून ते अमृत स्नान स्थळापर्यंत सुरक्षित पोहचण्यासाठी नियोजन करावे. त्यासाठी सर्व यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय असणे अतिशय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्वणीच्या दिवशी आणि इतर कालावधीत पुरेसा बंदोबस्त असेल याचे पूर्वनियोजन आतापासूनच करावे. संभाव्य अडचणी आणि आपत्तीचा विचार करून आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा. त्यासाठी आवश्यक साधनसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करून ठेवावे, असे निर्देश राजेशकुमार यांनी दिले.
मागील कुंभमेळ्यात प्रत्यक्ष कामे केलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांची मदत या कुंभमेळ्यासाठी घ्यावी. सूक्ष्म नियोजन, एकमेकांमध्ये समन्वय, अनुभवाची साथ तसेच लोकसहभाग या बळावर हा कुंभमेळा भव्य दिव्य, यशस्वी, अपघात आणि आपत्ती विरहित करण्याचे शिवधनुष्य प्रत्येक यंत्रणेने उचलावे. असे आवाहन राजेशकुमार यांनी केले. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा कुंभेमळा हा नाशिकसह महाराष्ट्राचे ब्रॅण्डिंग करण्याची मोठी संधी आहे. यामुळे आध्यात्मिक, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित कामे वेळेवर पूर्ण होतील, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणेवर असेल, असेही त्यांनी सूचित केले.
प्रारंभी, कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे प्राधिकरणाच्या कामांचा आढावा सादर केला.
