लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: शहरासह जिल्ह्यात सट्टा, पत्ता, जुगार यांसारखे अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांसह पोलीस अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटत चर्चाही केली. राज्याच्या प्रधान सचिवांकडेही तक्रारी केल्या. पोलीस अधीक्षकांना 22 वेळा पत्र देऊनही अवैध धंद्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही. एकप्रकारे या अवैध धंद्यांना सरकारचा पाठिंबाच असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला.

शहरातील मुक्ताई या निवासस्थानी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमदार खडसे म्हणाले की, जिल्ह्यात जुगार, पत्त्यांचे क्लब जोरात सुरू आहेत. वसुलीचे कार्यक्रम बिनधास्तपणे सुरू आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिले. त्यानंतरही 22 वेळा पोलीस अधीक्षकांना पत्र दिले. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नाही. कारवाई न झाल्याने गृहमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्याचे प्रधान सचिवांना प्रसारमाध्यमातूनही लघुसंदेश पाठवून तक्रारी केल्या. मात्र, तरीही कारवाई झाली नाही. अवैध धंद्यांबाबत एकही मंत्री, लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही. परिणामी जिल्ह्याची अवस्था मोठी वाईट झाली आहे. विधान परिषदेच्या अधिवेशनात जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत विचारलेल्या प्रश्‍नास गृहमंत्र्यांनी ठोस उत्तर दिले नाही. एकप्रकारे राज्य सरकारचाही या अवैध धंद्यांना पाठिंबाच असल्याचे यावरून दिसते. जिल्ह्यात अवैध धंद्यांच्या माध्यमातून महसूल व पोलीस अधिकार्‍यांची कोट्यवधींची हप्तेखोरी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आणखी वाचा-नंदुरबार: रस्त्यात बंद पडलेल्या रुग्णवाहिकेत प्रसुती

जिल्ह्यात वाळूमाफियांची मोठी दहशत आहे. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात सर्रासपणे अवैध अवैध उपसा व वाहतूक सुरू आहे. त्यावर महसूल व पोलीस प्रशासनाकडून कारवाईच होत नाही. याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे सांगितले. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव शहराचे वर्षभरात रूप पालटून दाखविणार, असा शब्द दिला होता. तो त्यांनी खरा करून दाखविला आणि शहर खड्ड्यात घातले, असा चिमटाही आमदार खडसे यांनी महाजनांना घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीच्या संघटनात्मक निवडणुका लवकरच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच झाली असून, खानदेशची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे जेथे 70 टक्के सदस्य नोंदणी झाली आहे, तेथे संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यांच्या निवडणुका होतील. त्यात धुळे शहर आणि ग्रामीण यांचा समावेश असून, दुसर्‍या टप्प्यात जळगाव जिल्ह्याच्या निवडणुका होतील, असेही खडसे यांनी सांगितले.