नाशिक : नाशिक स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या वतीने नऊ ते ११ जून या कालावधीत महाराष्ट्र राज्य स्त्रीरोग तज्ज्ञ संघाच्या वतीने अंबड येथील हॉटेल ताज येथे ‘एएमओजीएस २०२३ ‘ या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने चर्चासत्र, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या स्थापनेस ५० वर्षे पूर्ण झाली असून सध्या संघटनेचे ३४२ सभासद आहेत. संघटनेतर्फे नियमितपणे वैद्यकीय विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात. सभासदांचे वैद्यकीय ज्ञान अद्ययावत ठेवले जाते. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संघटनेतर्फे शालेय विद्यार्थिंनीसाठी हिमोग्लोबीन तपासणी, रक्तक्षय निवारण शिबिरे, लैंगिक शिक्षणावर व्याख्याने, पॅप स्मिअर तपासणी शिबिरे, स्तनपानाविषयी मार्गदर्शन, स्त्रीभ्रूण हत्त्या रोखण्यासाठी प्रबोधन असे कार्यक्रम राबविले जातात.

हेही वाचा >>> नाशिक : दिवसाही पोलिसांची शोध मोहीम; बेसावध गुन्हेगारांना धक्का, १५४ सराईतांवर कारवाई

ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी, अपंग, कष्टकरी महिला यांसारख्या दुर्बल घटकांसाठी विविध प्रकल्प राबवून नेहमी मदत दिली जाते. करोना काळातही संघटनेच्या सदस्यांनी व्यावसायिक सेवा अखंड सुरू ठेवून जबाबदारी पाडली. परिषदेत तीन दिवसांवर वेगवेगळ्या विषयांवर वैचारिक मंथन होणार आहे. आठ जून रोजी रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी चार वाजता जनप्रबोधन समितीतर्फे डाॅ. वर्षा लहाडे आणि त्यांच्या सहकार्यांनी ‘आशा’ कार्यकर्त्यांसाठी घेतलेल्या प्रशिक्षण व प्रबोधन शिबिरांची माहिती देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> सर्वेक्षणानुसार धुळे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला यशाची खात्री; जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांचा दावा

स्त्रीरोग शास्त्रातील विविध विषयांवर परिषदेत सत्रे आयोजित केली असून देशभरातून येणाऱ्या मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर तसेच अभिनेत्री नम्रता संभेराव यांची हजेरी हे विशेष आकर्षण आहे. शुक्रवारी हॉटेल ताज येथे सायंकाळी सहा वाजता स्त्रीरोग तज्ज्ञांच्या महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष डाॅ. राजेंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हृषिकेश पै यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे, तसेच खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन होईल.