जळगाव – यावल तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी सकाळी महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर दोन गटांत तुफान दगडफेक झाली. त्यात १० ते १५ जण जखमी झाले असून, त्यात महिला फौजदार सुनीता कोळपकर यांच्यासह पाच पोलीस जखमी झाले. घटनेला काही दिवसांपूर्वी बारा गाड्यांच्या कार्यक्रमातील वादाची किनार असल्याचे सांगण्यात येते.

अट्रावल येथे काही समाजकंटकांनी महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना केली. परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी ग्रामस्थांना मारहाण करीत पलायन केले. काही मिनिटांत घटनेची माहिती परिसरात पसरताच दोन गटांत दगडफेकीसह हाणामारी झाली. याप्रसंगी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत दिवाकर टोपलू, छाया तायडे, दिवाकर तायडे, पद्माकर तायडे, विकी तायडे, रितेश दिवाकर तायडे, ममता विजय कोळी, समाधान सुधाकर कोळी, शेखर प्रभाकर कोळी यांच्यासह महिला फौजदार सुनीता कोळपकर आणि पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. गावात दुपारी दीडच्या सुमारास वातावरण नियंत्रणात आले.

हेही वाचा – कामयानीसह तीन एक्स्प्रेस गाड्यांना नांदगाव थांबा मंजूर

हेही वाचा – भुसावळला मोदी सरकारविरुद्ध युवक काँग्रेसचा रास्ता रोको

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश मानेगावकर व त्यांचे सहकारी अट्रावलमध्ये ठाण मांडून आहेत. फैजपूर, भुसावळ, सावदा, यावल येथील पोलीस कुमक मागविण्यात आली असून, गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिसांनी घटनेतील संशयितांची धरपकड सुरू केली आहे. जखमींना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुणीही अफवा पसरवू नये, कुणीही समाजमाध्यमात दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.