गळणाऱ्या नळांची पाहणी करून १५ लाखांहून अधिक लिटर पाण्याची बचत

नाशिक : शालेय जीवनात जलसाक्षरतेचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर रुजावे यासाठी पर्यावरण सेवा योजना विभागाने राबविलेल्या अनोख्या उपक्रमात जिल्ह्यातील १४ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. करोना काळात गावातील गळणाऱ्या नळांची पाहणी करीत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना पाणी बचतीचा संदेश दिला. या उपक्रमामुळे सहा महिन्यांत १५ लाखांहून अधिक लिटर पाण्याची बचत झाली आहे.

अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असतो. विविध माध्यमातून पाणी बचतीचा संदेश दिला जात असला तरी या विषयी कमालीची उदासिनता आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण सेवा योजना विभागाकडून विद्यार्थी जलसाक्षर व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे सध्या हे विद्यार्थी घराघरांत ‘जलदूत’ म्हणून भूमिका निभावत असून घरातील मोठय़ा माणसांकडून पाणी वापराबाबत होणाऱ्या चुका ते निदर्शनास आणून देत आहेत.

करोनामुळे गेली दीड वर्षे शाळा बंद होत्या. घरात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना पर्यावरण सेवा योजनेंतर्गत सर्व कृती उपक्रम घरगुती पातळीवर राबविता यावे यासाठी घरातील गळके नळ, पाणी गळती याबाबत पाहणी करण्याविषयी सुचविण्यात आले. याबाबत समाजमाध्यमातून माहिती पत्रके पाठविण्यात आली. पाण्याचे परीक्षण करण्यासाठी मोजपात्र (एम.एल.) किंवा औषधाच्या बाटलीचे झाकण (जे पाच एमएलचे असते), घडय़ाळ, नोंदवही आदी साहित्यांची जमवाजमव करण्यात आली.

पहिल्या टप्प्यात घरातील एकूण नळ किती, त्यापैकी किती नळ गळके आहेत, याचा अभ्यास केला गेला. थेंब थेंब पाणी किती मिनिटात किती मिलिमीटर गळते याबाबतचे मोजमाप विद्यार्थ्यांनी मोजपात्रात केले. त्यावरून एका मिनिटाचे, एका तासाचे, एका दिवसाचे आणि एका महिन्याचे तसेच एक वर्षांत किती पाणी वाया जाते याबाबत गणितीय आकडेमोड  करून  व्हॉट्स अ‍ॅप गटावर विद्यार्थ्यांनी माहिती दिली. याचा पुढील टप्पा म्हणजे गळती बंद करण्यासाठी विद्यार्थी काय उपाय योजना करतील. म्हणजे नळ बदलविणे किंवा त्याला असलेल्या पर्यायांवर (जसे एमसील किंवा रबर गुंडाळणे, या कृतीमुळे पाण्याचा थेंब थेंब वाचेल व वर्षभर गळती होण्यापासून थांबवली जाईल) काम करण्यात येत आहे.