नाशिक : पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.. जय जय रामकृष्ण हरी.. पांडुरंग पांडुरंग असा विठ्ठलनामाचा जयघोष करत येथील बॉईज टाऊन शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सहभाग असलेली वारी काढण्यात आली. या वारीदरम्यान रिंगणही करण्यात आले. वारकऱ्यांनी अभंगांचा आनंत घेत ताल धरला.

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर गेल्या १३ वर्षांपासुन बॉईज टाऊन शाळेत विद्यार्थ्यांना वारी अनुभवता यावी यासाठी प्रतीकात्मक रुपात शाळेच्या मैदानात वारी काढण्यात येते. सोमवारी अशीच वारी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात टाळ, डोक्यावर टोपी आणि मुखाने ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करत वारीत रंग भरले. विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकांनीही या सोहळय़ात उत्साहाने भाग घेतला. मोक्षदा हिवाळे आणि मधुरा खालकर यांनी विठ्ठलाच्या नामस्मरणाचा महिमा गात वारीस सुरूवात केली. शिक्षकांनी जय जय रामकृष्ण हरी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, ज्ञानोबा माऊली तुकाराम या अभंगाचे गायन करत टाळ आणि वीणाच्या ठेक्यावर ताल धरला. नृत्य तसेच फुगडी खेळत प्रत्यक्षात पंढरपूरच्या भक्तीमय वातावरणाची अनुभूती उपस्थितांना यामुळे झाली. या नयनरम्य आणि भक्तीमय वारीचा समारोप वारकरी संप्रदायाच्या प्रार्थनेने झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.