scorecardresearch

MLC Election : सत्यजीत तांबे काँग्रेस की भाजपाला पाठिंबा देणार? सुधीर तांबे यांचं सूचक विधान; म्हणाले…

“शरद पवारांनी यापूर्वीही भूमिका मांडली होती की…”

Sudhir Tambe
सुधीर तांबे (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल गुरुवारी ( २ जानेवारी ) जाहीर झाला. नाशिक पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीत उमेदवारीवरून सत्यजीत तांबे आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर, महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली होती. तिन्ही पक्षांचा पाठिंबा असताना सत्यजीत तांबेंनी शुभांगी पाटलांचा पराभव केला आहे. या विजयानंतर सत्यजीत तांबेंचे वडिल सुधीर तांबे यांनी प्रतिक्रिया देत जनतेचे आभार मानले आहेत.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुधीर तांबे म्हणाले की, “मी तेरा वर्ष या मतदारसंघातून निवडून गेलो आहे. येथील लोकांनी खूप प्रेम दिलं आहे. सत्यजीतवर विश्वास दाखवत आमच्या परिवारावही विश्वास टाकला आहे. जनतेचे प्रश्न सोडवणे हेच सत्यजीतचं उद्दिष्ट असंल पाहिजे.”

सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर त्यांच्या मुलीची बोलकी प्रतिक्रिया; म्हणाली, “माझे बाबा…”!

“मी पहिल्या वेळेस अपक्ष निवडून आलो होते. सत्यजीतही अपक्ष निवडून आला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे गेली, असं म्हणता येणार नाही. पुढं काय होतं ते पाहूयात. राजकीय भविष्य आपल्याला घडवावं लागतं, ते पक्षावर अवलंबून नसते. म्हणून सत्यजीतने जास्तीत जास्त लोकांना जोडत अभ्यासपूर्ण रितीने विधिमंडळात काम करावे,” असा सल्ला सुधीर तांबेंनी दिला आहे.

Maharashtra Latest Breaking News Today : अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी; भाजपाचा पराभव

‘काँग्रेसने सत्यजीतला उमेदवारी दिली असती तर असं काही घडलंच नसतं, अशा कानपिचक्या’, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिल्या आहेत. याबद्दल विचारल्यावर सुधीर तांबेंनी सांगितलं, “शरद पवारांनी यापूर्वीही भूमिका मांडली होती की, सामंजस्यपणाने हा प्रश्ना सोडवता आला असता. तिच भूमिका अजित पवारांनी मांडली आहे. आम्हाला खूप वाईट वाटलं. कारण, वर्षोनुवर्षे आम्ही त्या पक्षाता काम करत आहे. संवादाद्वारे हा प्रश्न मिटला असता.”

विधान परिषदेत भाजपला धक्का; नागपूरची हक्काची जागा गमावली, महाविकास आघाडीचे वर्चस्व

सत्यजीत तांबे काँग्रेस की भाजपाला पाठिंबा देणार असं विचारल्यावर सुधीर तांबेंनी म्हटलं, “सध्या सत्यजित अपक्षच आहे. माझा सल्ला आहे की त्यानं अपक्षच राहावं. पण, याबद्दल आमच्या परिवारात चर्चा करून पुढील निर्णय घेऊ. एबी फॉर्म हा माझ्या नावाने आला होता,” असं स्पष्टीकरणही सुधीर तांबेंनी दिलं.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 09:43 IST