नाशिक : आता कोणीही उठेल आणि भाजपमध्ये प्रवेश करेल, असे राहिलेले नाही. संबंधिताची पार्श्वभूमी आणि पोलिसांकडील नोंदी तपासल्या जातात. सर्व अनुकूल असेल, तेव्हा प्रवेश मिळतो. असे भाजपमध्ये प्रवेश करताना सुनील बागूल यांनी सांगितले.

ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले उपनेते सुनील बागूल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी रविवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या सोहळ्यास देवयानी फरांदे, सीमा हिरे व राहुल ढिकले या स्थानिक आमदारांसह चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात मोठे शक्तीप्रदर्शन करीत बागूल यांनी आपली ताकद दाखवली. एका विशिष्ट घटनाक्रमानंतर त्यांच्यासह राजवाडे यांचा हा प्रवेश झाल्यामुळे ठाकरे गटाकडून भाजपवर टीका झाली. महिनाभरापूर्वी बागूल व राजवाडे यांच्याविरोधात मारहाण व चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांचा अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न होता. नंतर तक्रारदाराने भूमिका बदलून गंभीर स्वरुपाची तक्रार मागे घेतल्याचे म्हटले होते.

भाजपमध्ये प्रवेश करताना ठाकरे गटाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना बागूल यांनी एकप्रकारे प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. बागूल हे पूर्वी भाजपमध्ये् पाच वर्षे कार्यरत होते. त्यांना पक्षात पुन्हा घेण्यासाठी कोणी, कोणी किल्ला लढविला ते कथन केले. यावेळी प्रवेशाची परीक्षा अवघड ठरली. पुन्हा भाजपमध्ये येण्याचे ठरवले, तेव्हा अनेक चाचणीतून सामोरे जावे लागले. गिरीश महाजन यांच्याशी भेट झाल्यानंतर स्थानिक आमदार व पदाधिकारी यांचा ना हरकत दाखला अर्थात एनओसी आणली का, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) काही तक्रार आहे का, असे पाच ते सहा प्रश्न विचारले गेले. आपल्या भाजप प्रवेशाला कुणाचीही हरकत नसल्याचे सांगितल्यावर या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. तेव्हा जणू महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएसस्सी) परीक्षा उत्तीर्ण झाल्याची भावना झाल्याचे बागूल यांनी सागितले.

राहुल ढिकलेंकडून असेही कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमात बागूल यांच्या संघटन कौशल्याचे स्थानिक आमदारांनी कौतुक केले. यावेळी आमदार राहुल ढिकले यांनी विधानसभा निवडणुकीत बागूल हे विरोधी पक्षात असतानाही त्यांनी अप्रत्यक्षपणे मदत केल्याची भावना व्यक्त केली. कित्येेक वर्षांपासून बागूल यांच्याकडे सामान्य माणूस आपले प्रश्न मांडायला जातात. त्यांंच्या घरी दरबार भरलेला असतो. जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद अशा कला त्यांना अवगत असल्याचे ढिकले यांनी सांगितले. आ. देवयानी फरांदे यांनीही बागूल यांनी श्रमिक सेनेच्या माध्यमातून कामगार व रिक्षा चालकांच्या केेलेल्या संघटनकडे लक्ष वेधले.