जळगाव – जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या जळगाव ते नंदुरबार मार्गावर अमळनेर स्थानकाजवळ गुरूवारी दुपारी कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे सात डबे इंजिनसह अचानक रूळावरून घसरले होते. या अपघातामुळे ठप्प झालेली भुसावळ-सुरत दरम्यानची सर्व प्रकारची रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. अखेर शुक्रवारी सकाळी डाऊन मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

दरम्यान, अप मार्गावरील वाहतूक अजूनही ठप्पच असून, ती सुरळीत करण्यासाठी रेल्वेकडून अपघातग्रस्त डबे रूळावरून हटविण्याचे काम सुरूच आहे. गुरूवारी रात्री पावसामुळे थोडा व्यत्यय आला होता. कोळसा बाहेर काढल्यानंतर रिकामे झालेले डबे मोठ्या क्रेनच्या सहाय्याने रूळावरून बाजूला हटविण्यात येणार आहेत. याशिवाय, अपघातामुळे नादुरूस्त झालेले रूळ व ओव्हरहेड वायर देखील तातडीने दुरूस्त केली जाणार आहे.

त्यासाठी पश्चिम रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेरनजीक झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे गुरूवारी दुपारपासूनच लांबपल्ल्याच्या अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या. याशिवाय भुसावळहून नंदुरबार, सुरत आणि दादरकडे जाणाऱ्या काही प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या.

तसेच काही गाड्या भुसावळपर्यंत न धावता नंदुरबार आणि दोंडाईचापासून परत गेल्या. तर भुसावळ ते उधना प्रवासी गाडी नंदुरबारहून सोडण्यात आली. याकारणाने, लांबच्या प्रवासाचे नियोजन केलेल्या अनेक प्रवाशांचे खूप हाल झाले. ऐनवेळी दुसऱ्यामार्गे गाड्या वळविण्यात आल्याने संबंधितांना इच्छितस्थळी पोहोचण्यास खूपच उशीर झाला. काही प्रवाशांना जागच्या जागी गाड्या थांबल्याने बराच वेळ ताटकळावे लागले.

रेल्वे प्रशासनाने ठिकठिकाणच्या स्थानकांवर मदत कक्ष सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला. स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिकांनीही ताटकळलेल्या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्यासह बिस्किट पुड्यांची व्यवस्था धरणगावसह इतर स्थानकांवर केली. डाऊन मार्गावरील वाहतूक सुरळीत झालेली असली तरी, अप लाईनवरील वाहतूक सुरळीत होण्यास अजून बराच वेळ लागू शकतो, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.