मालेगाव : बोगस शिक्षक भरती प्रकरणी तीन बड्या अधिकाऱ्यांना झालेल्या अटकेमुळे नाशिक जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग पुरता बदनाम झाला असताना शिक्षक नियुक्ती फसवणुकीच्या दाखल असलेल्या दुसऱ्या एका गुन्ह्यात हा विभाग दोन वर्षांपासून चक्क पोलिसांनाच ठेंगा दाखवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सातत्याने मागणी करूनही फसवणुकीच्या गुन्ह्यातील तपासासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे देण्यास जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याने संबंधित प्रकरणाचा तपास रखडला आहे.
मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सत्यवती कौर माध्यमिक विद्यालयातील बोगस शिक्षक नियुक्ती व शासन अनुदान फसवणूक केल्याप्रकरणी १ नोव्हेंबर २०२३ रोजी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. या शाळेतील बी.ए.बी.एड.च्या रिक्त पदावर समाधान निमडे या डी.एड शिक्षकाला १ मार्च २०१० पासून पदोन्नती दिली गेली असताना त्याच पदावर संस्थेने १४ जून २०१० पासून सुभाष धाडीवाल यांची नियुक्ती केली. याप्रकरणी निमडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर १९ जून २०१९ रोजी धाडीवाल यांची मान्यता रद्द करण्यात आली. तसेच डी.एड. वेतनश्रेणीचे पद रिक्त नसताना अजित लाठर यांना संस्थेने याच शाळेत नियुक्ती दिली. तसेच १४ जून २०१० ते २८ मार्च २०२३ पर्यंत शासनाकडून वेतनही घेण्यात आले. या दोन्ही प्रकरणांच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी तक्रार केल्यावर शिक्षण विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांची पोलीस तपासासाठी आवश्यकता असल्याने भद्रकाली पोलिसांनी गेल्या दोन वर्षात जिल्हा परिषद नाशिकच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे चार वेळा पत्र पाठवून मागणी केली. परंतु शिक्षण विभागाने या पत्रांना साधे उत्तर दिले नाही की, मागितलेली कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची तसदी घेतली नाही. यामुळे संबंधित गुन्ह्याच्या तपास कामात अडथळा निर्माण झाला आहे. पोलिसांकडून आलेल्या लेखी पत्रांना केराची टोपली दाखवणारा शिक्षण विभाग किती निर्ढावलेला आहे, याची देखील यानिमित्ताने प्रचिती येत आहे.
बोगस शिक्षक मान्यतेप्रकरणी मालेगावातील पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात शिक्षणाधिकारी प्रविण पाटील व तत्कालीन उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्या विरोधात यापूर्वी गुन्हा दाखल आहे. तसेच बोगस भरती प्रकरणी येथील छावणी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात कार्यालय अधीक्षक सुधीर पगार याच्यावर गुन्हा दाखल आहे. या तिघांवर एकाच दिवशी अटकेची कारवाई झाल्याने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली होती. तिघांपैकी उदय देवरे याची जामिनावर सुटका झाली आहे, तर प्रवीण पाटील व सुधीर पगार हे दोघे अद्याप तुरुंगात आहेत. याच देवरे याने टोकडे येथील शाळेतील फसवणूक प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासाच्या अनुषंगाने लागणारी कागदपत्रे पोलिसांना देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शिक्षण विभागाच्या हेतूबद्दल संशय निर्माण झाला आहे.
‘कायद्याचा बालेकिल्ला’ येथेही हवा..
फसवणुकीच्या गुन्ह्यात आवश्यक असणारी कागदपत्रे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पोलिसांना मुद्दाम दिली जात नाहीत. तसेच त्यामुळे या गुन्ह्याचा तपास पुढे सरकत नाही,अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी केली आहे. अवैध धंदे व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी नाशिक शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ ही मोहीम पोलिसांकडून राबवली जात आहे, तशीच कारवाई पोलिसांनी शिक्षण विभागात करावी,अशी अपेक्षा द्यानद्यान यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांना असहकार्य करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात सहआरोपी करावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
