लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : शिवसेनेचे २५ वर्षे आमदार राहिलेले ठाकरे गटाचे उपनेते तथा माजी मंत्री बबन घोलप यांनी अखेर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक होते. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या मागण्या मांडण्याच्या निमित्ताने अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून घोलप यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली. शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदावरून अकस्मात काढून आपणास अपमानित करण्यात आले. आपण नेमलेले पदाधिकारी बदलले गेले. या संदर्भात दाद मागूनही नेतृत्वाकडून कुठलेही उत्तर मिळाले नसल्याची तक्रार घोलप यांनी केली आहे.
काही महिन्यांपासून घोलप हे नाराज असल्याची चर्चा होती. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी ते इच्छुक होते. पण माजी खासदार भानुदास वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने त्यांच्या उमेदवारीविषयी साशंकता व्यक्त होऊ लागली. याच सुमारास शिर्डीचे संपर्कप्रमुख म्हणून आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती झाली. आपल्याला विश्वासात न घेता ही नियुक्ती झाल्याचे सांगत घोलप यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. या घटनाक्रमापासून ते पक्षापासून अंतर राखून होते. नेत्यांचे दौरे झाले तरी, घोलप कुठेही दृष्टीपथास पडत नव्हते. त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप अधुनमधून कार्यक्रमात हजेरी लावत असे. पण बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात घोलप पिता-पुत्र दोघेही अनुपस्थित होते.
आणखी वाचा-भेसळयुक्त सुपारींचा तीन कोटी रुपयांचा साठा जप्त, ११ मालमोटारींमधून अवैध वाहतूक
काही दिवसांपूर्वी माजीमंत्री घोलप यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी ही भेट होती. घोलप हे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महासंघाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन बहुतांश मान्य केल्याचे त्यांनी म्हटले होते. या बैठकीनंतर घोलप यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली. घोलप हे अद्याप पक्षातच असल्याचे सांगत असताना गुरुवारी त्यांनी उद्धव ठाकरे यांना थेट शिवसैनिक या पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र पाठवले. आजवर आपण शिवसैनिक म्हणून निष्ठेने काम केले. पक्षाने जी जबाबदारी दिली ती सांभाळली. परंतु, शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरून आपणास काढून अपमानित करण्यात आले. आपण ज्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना काढले होते, त्यांनाही बदलण्यात आले. हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी केला. जुने पदाधिकारी बिनकामाचे असल्याचे सहा विधानसभा संपर्कप्रमुखांनी लेखी स्वरुपात कळवूनही त्यांना परत पदे दिली गेली हे पाहून आपण अचंबित झालो. आपले नेमके काय चुकले हे समजत नाही. या संदर्भात आपण दाद मागितली. पण काहीच उत्तर मिळाले नाही. आपली वकिली करणारे गप्प आहेत. त्यामुळे आपण थांबून घेणे महत्वाचे वाटते, असे नमूद करत घोलप यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.