धुळे – जिल्हा रुग्णालयाच्या आवाराची स्वच्छता, रुग्णांसाठी बाकडे, वाहनतळ अशी व्यवस्था पूर्ण न केल्यास आरोग्य मंत्र्यांना कॅथ लॅबचे उदघाटन करू देणार नाही, असा पवित्रा घेत शिवसेनेतर्फे (उध्दव ठाकरे) सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर. आर. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्ता दिघावकर यांना घेराव घालण्यात आला.
धुळे जिल्हा रुग्णालय वेगवेगळ्या कारणांमुळे कायमच चर्चेत असते. रुग्णालयाच्या परिसरातील अस्वच्छतेविषयी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडूनही कायम तक्रारी करण्यात येत असतात. परंतु, त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. याआधीही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महिन्याभरापूर्वी जिल्हा रुग्णालयातील गटारीसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर. आर. पाटील यांना निवेदन दिले होते. अतिरिक्त पाण्यामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य समस्यांची माहिती देऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी जाणीव करून देण्यात आली होती.
यानंतरही जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रचंड कचरा, काटेरी झुडपे वाढली. गटारींचे पाणीही वाहत असते. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागाच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्याचीदेखील स्वच्छता झालेली नाही. यामुळे संपूर्ण जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पाणी साचत आहे. दोन दिवसांपूर्वी तर रुग्णालयाच्या अपघात विभागात आणि सामान्य रुग्णालयातही पाणी शिरले होते. अशा परिस्थितीमुळे रुग्णांनाही त्याचा त्रास होतो. रुग्ण लवकर बरा होण्यासाठी रुग्णालय आणि रुग्णालयाच्या आवारात स्वच्छता असणे महत्वाचे असते. प्रसन्न वातावरण असल्यास रुग्णालयात काम करणाऱ्यांनाही उत्साह वाटतो. परंतु, रुग्णालय परिसर जर अस्वच्छता, गटारीचे पाणी याने भरलेला असेल तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही उत्साह वाटणार नाही. या पार्श्वभूमिवर, रुग्णांना सुविधा उपलब्ध करून न दिल्यास कॅथ लॅबच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या आरोग्य मंत्र्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून जाणाऱ्या नाल्याची आणि अंतर्गत विभागाच्या स्वच्छतेचे काम धुळे महानगरपालिका स्वच्छता विभागाकडून केले जाते, यामुळे या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधीक्षक अभियंता यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, भरत मोरे, सुनील पाटील, प्रशांत भामरे, निंबा मराठे, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, पिनु सूर्यवंशी, निलेश कांजरेकर, ज्योती चौधरी, विष्णू जावडेकर योगेश पाटील, नासिर पिंजारी, वैभव पाटील व तेजस सपकाळ आदी उपस्थित होते.