जळगाव : शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सदैव विरोध करणारे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना आता उपनेता पदावर बढती मिळाली आहे. यासह रावेर लोकसभा मतदारसंघ आणि नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
१९८४ मध्ये धरणगावात विद्यार्थी सेनेच्या शाखेची स्थापना केल्यानंतर गुलाबराव वाघ शिवसेनेशी जोडले गेले. त्यानंतर त्यांना नेतृत्व गुणांच्या जोरावर शिवसेनेचे धरणगाव शहर प्रमुख, एरंडोल उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख तसेच उपजिल्हा प्रमुख, जिल्हाप्रमुख, अशा पदांवर काम करण्याची संधी मिळाली. पैकी जिल्हा प्रमुखाची जबाबदारी त्यांनी तब्बल २० वर्षे सांभाळली. अलीकडील तीन वर्षांपासून ते जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. उल्लेखनीय म्हणजे गुलाबराव वाघ हे एरंडोलचे शिवसेना तालुका प्रमुख असताना मंत्री गुलाबराव पाटील तेव्हा उपतालुका प्रमुख होते.
कालांतराने पाटील यांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद सांभाळत असताना, एरंडोलमधून विधानसभेची उमेदवारी मिळाली. सलग दोन पंचवार्षिक विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर ते शिवसेनेचे उपनेतेही बनले. गुलाबराव पाटील विधानसभेवर गेल्यानंतर गुलाबराव वाघ यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद आले. मात्र, ज्या गतीने पाटील यांची शिवसेनेत राहून प्रगती झाली, तशी प्रगती वाघ यांची झाली नाही.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र, गुलाबराव वाघ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर गेले नाहीत. जळगाव ग्रामीणच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत जो कोणी उमेदवार वेळोवेळी देण्यात आला, त्याच्या पाठीशी वाघ खंबीरपणे उभे राहिले. प्रसंगी, शिंदे गटाचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जाहीर सभांमध्ये आक्रमक पवित्रा घेण्यासही त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर अनेक मातब्बरांनी पक्ष सोडला, तरी वाघ ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले. त्याचीच पावती म्हणून पक्षश्रेष्ठींनी आता त्यांना उपनेतेपदी बढती दिली आहे. वाघ यांना उशिरा का होईना पक्षाने न्याय दिल्याची भावना त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.