जळगाव – उद्धव ठाकरेंविषयी नाही, तर संजय राऊतांविषयी रोष व्यक्त करीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कट्टर समर्थकांनी काहीही झाले तरी आम्ही पाचोरा येथील सभेत जाऊच, संजय राऊत यांनी आम्हाला थांबवून दाखवावे, असे आव्हान दिले आहे.

रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता पाचोरा येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वीच ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. सर्वप्रथम गुलाबराव पाटील यांनी राऊत यांना आपल्याविषयी काही बोलल्यास पाचोर्‍यातील सभेत घुसण्याचा इशारा दिला होता. तर, राऊत यांनीही घुसून दाखवाच, असे आव्हान दिले होते. त्यावर शिंदे गटाने सभेत शिरणारच, आम्हाला अडवून दाखवावे, असे आव्हान दिले आहे.

हेही वाचा – मालेगाव: कांदा अनुदानासाठी पीक पेरा नोंदीची अट रद्द

शिंदे गटाने पाचोरा येथील सभेत मंत्री पाटील यांचा मुखवटा लावून शिरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील रणनीती आखण्यासाठी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, नगरसेवक गणेश सोनवणे, सरिता माळी, ज्योती शिवदे आदी पदाधिकाऱ्यांची अजिंठा विश्रामगृहात बैठक झाली. सुमारे अडीचशेपेक्षा अधिक वाहनांतून शिवसैनिकांची पाचोरा येथे जाण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिंदे गटाचा हा नुसता फार्स असून घुसणारा काही वाजतगाजत जात नाही. जाणीवपूर्वक हिरोगिरी करण्याचा फाजील प्रयत्न असल्याची टीका ठाकरे गटाचे जळगाव लोकसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केली आहे.

हेही वाचा – “त्र्यंबकेश्वरमध्ये अजूनही जातिभेद, गावजेवणात जातीनुसार वेगवेगळ्या पंगती”, अंनिसचा गंभीर आरोप, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचोर्‍यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पाचोऱ्यातील सभेपूर्वी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी राजकीय हालचालींचा आढावा घेतला. त्याअनुषंगाने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर असून, पाचोर्‍यात पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यात अप्पर पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उपअधीक्षक, १० निरीक्षक, तसेच इतर २० अधिकारी, ४०० कर्मचारी, गृहरक्षक दलाच्या १०० जवानांसह दंगानियंत्रण पथक असा बंदोबस्त राहणार आहे.