जळगाव – जिल्ह्यात सहा वर्षाखालील मुलांच्या पोषण व आहार विषयक दर्जात सुधारणा करण्यासह बाल मृत्यू व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सुमारे चार हजार अंगणवाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात, त्यापैकी बऱ्याच अंगणवाड्यांची वेळेवर देखभाल व दुरूस्ती न झाल्याने सध्या दुर्दशा झाली आहे. मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला असतानाही प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर डोळेझाक केल्याचे दिसून आले आहे. 

जळगाव जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात ३४३५ आणि शहरी भागात ५०८ अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी सहा वर्षाखालील मुलांना पूरक पोषण आहार पुरविण्यासह अनौपचारिक शिक्षण तसेच गर्भवती स्त्रियांसह स्तनदा मातांना लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा पुरविण्याकरीता तालुकास्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशी यंत्रणा कार्यरत आहे. अंगणवाड्यांमध्ये बालकांच्या आरोग्याशी सबंधित सूक्ष्म लक्षणांच्या नोंदीही घेण्यात येतात, जेणेकरून त्यांच्यावर वेळीच उपचार करणे सोपे जाते.

जिल्ह्यात नवीन अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतुदही करण्यात आली आहे. मात्र, त्यासोबतच १० ते १२ वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या अंगणवाड्यांच्या दुरूस्तीकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद केली जात असताना, दुरूस्तीसाठी मात्र कोणताच निधी राखीव ठेवला जात नसल्याचे दिसून येते. अनेक अंगणवाड्यांच्या इमारती खूप जुन्या झाल्या आहेत. त्यांची गेल्या काही वर्षात साधी डागडुजी झालेली नाही. त्यामुळे गळतीसह भिंतीला तडे जाण्याच्या समस्या वाढल्या आहेत. पावसाळ्यात अनेक अंगणवाड्यांमध्ये पाणी साचते. गळतीमुळे मुलांना ओल्या जागेत बसावे लागते. परिणामी, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्रसंगी पोषण आहारासाठी वापरला जाणारे साहित्य पाण्यात भिजून नुकसान होते.

अनेक अंगणवाड्यांमध्ये शौचालयांसह पिण्याच्या पाण्याची सोय नाही. काही शौचालये असली तरी ती मोडकळीस आली आहेत. ज्यामुळे मुलांसह सेविका व मदतनिसांचे हाल होतात. अंगणवाड्यांची दुरवस्था मुलांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर परिणाम करते. सेविका आणि मदतनीस यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो. दरवाजे व खिडक्या तुटल्याने आतमध्ये साप आणि उंदीर यांचा वावर वाढतो. ही सर्व स्थिती लक्षात घेता एकूणच अंगणवाड्यांची दुर्दशा ही एक गंभीर समस्या आहे. दुर्दशा झालेल्या अंगणवाड्यांची तातडीने दुरूस्ती करणे आवश्यक झाले आहे.

अंगणवाड्यांच्या दुरूस्तीची प्रक्रिया थोडी वेळखाऊ आहे. दुरूस्तीचा प्रस्ताव पाठविल्यानंतर किमान चार महिने तरी लागतात. तोपर्यंत अंगणवाडी दुसरीकडे तात्पुरती स्थलांतरीत केली जाते. किंवा गळती रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना केल्या जातात.-हेमंत भदाणे (जिल्हा कार्यक्रम अधिकारी- महिला व बाल विकास विभाग, जळगाव)