नाशिक : सिन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर दिवसागणिक वाढत असून मानवी वस्तीवर हल्लामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. मागील महिन्याभरात तीन बालकांवर सिन्नर तालुक्यात बिबट्याने हल्ला केला असून दोन जणांना जीव गमवावा लागला. शनिवारी रात्री सिन्नर तालुक्यातील पांचाळे शिवार परिसरात शेत वस्तीवर काम करत असलेल्या शेतमजुराच्या दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या प्रकाराने सिन्नर परिसरात खळबळ उडाली असून रविवारी ग्रामस्थांनी रास्ता रोको करत आपला निषेध व्यक्त केला.

सिन्नर परिसरात खडांगळी येथील शेतकरी अर्जुन कोकाटे निमगाव देवपुर शिवारात राहतात. त्यांच्या चाळीमध्ये काही काेकणी कामगार कामासाठी आले आहेत. शनिवारी हे कामगार मका तोडणीसाठी शेतावर गेले होते. त्या वेळी मक्याचा शेतात दबा धरून बसलेला बिबट्याने या संधीचा फायदा घेत चाळीमध्ये प्रवेश करत झोळी मध्ये झोपलेल्या बालकाला उचलून घेत लांब वर नेले. या हल्लात दीड वर्षीय गोलु शिवराज शिंगाडे याचा जीव गेला. त्याचे पालक पेठ तालुक्यातील कुंबाळे येथील रहिवासी आहेत. मजुरीसाठी या ठिकाणी आले होते. गोलुचे शव विच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकिय रुग्णालयात आणण्यात आले.

या हल्लानंतर परिसरात नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा हल्ला रोखा, त्याला जेरबंद करा या मागणी साठी ग्रामस्थांनी रास्ता रोको करत वन विभागाला धारेवर धरले. पोलीसांच्या मध्यस्थीने रास्ता रोको मागे घेण्यात आले आहे. दरम्यान, वनविभाग युध्दपातळीवर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून अन्य माध्यमातून प्रयत्न सुरू आहे.

पाच दिवसांपासूर्वी सारंगचा जीव गेला

सिन्नर तालुक्यातील पांचाळे परिसरात सारंग थोरात हा दहा वर्षीय बालक मोठ्या बहिणी सोबत अंगणात लपाछपी खेळत असतांना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याला उचलून नेले. या हल्लात त्याचा मृत्यू झाला. अवघ्या पाच दिवसात याच परिसरानजीक असलेल्या खडांगळी येथील दीड वर्षीय गोलुचाही बिबट्याचा हल्लात जीव गेला. सिन्नर तालुक्यात मागील आठ महिन्यातील ही तिसरी घटना आहे.

वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न

सिन्नर तालुक्यात गहू, मका, सोयाबीन याची शेती आहे. या मुळे उंच पाल्यात बिबट्या दबा धरून बसत आहे. या पीकांमुळे तसेच येथील परिसर हा विखुरला गेला आहे. याचा परिणाम बिबट्याला शोधकार्यावर होत आहे. बिबट्याचे वाढते हल्ले पाहता परिसरात पिंजरे लावले आहेत. या शिवाय ड्रोनच्या माध्यमातून शोध घेण्यात येत आहे. मात्र हा बिबट्या एका ठिकाणी स्थिर नाही. शनिवारच्या घटनेनंतर मदतीसाठी इगतपुरी येथुन जादा कुमक मागवण्यात आली याशिवाय संगमनेर हून श्वानपथक पाचारण केले आहे. रविवारी श्वानपथकाने दुपार पर्यंत १२ किलो मीटर हून अधिक परिसर तपासला. – हर्षल पारेकर वनपरिक्षेत्र अधिकारी, सिन्नर