वरुणराजाच्या सलामीत आज तिसरा व अखेरचा शाही स्नान सोहळा संपन्न झाला. आज अखेरच्या शाही स्नानाच्यावेळी पाऊस आल्याने कुंभमेळ्यामध्ये चैतन्याचे वातावरण असून, साधूंनी ही वरूणराजाची कृपा असल्याची भावना व्यक्त केली होती.
आजच्या पर्वणीला पावसामुळे भाविकांची गर्दी कमी दिसली मात्र, साधूंनी अतिशय उत्साहात शाही स्नानात सहभाग घेतला होता. पावसामुळे शाही स्नानासाठी निघालेल्या मिरवणुकींना थोडा विलंब झाला होता. त्यातचं, खालसा आखाड्याने आधी स्नान केल्याने दिगंबर आखाड्याचे साधू नाराज झाले होते. त्यांनी दिगंबर आखाड्यावर बहिष्काराचा इशाराही दिला होता. परंतु पालक मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाने परिस्थिती व्यवस्थित हाताळली. आधी शस्त्रास्त्रांचं पूजन व्हायला हवं अशी भूमिका घेत दिगंबर आखाड्याच्या साधुंनी हरकत घेतली होती. पहाटे पावणे सहा वाजता निर्वाणी आखाडा शाहीस्नानासाठी निघाला होता. या आखाड्यामध्ये तब्बल ७० चित्ररथ होते. त्यापाठोपाठ दिगंबर आखाडा, मग निर्मोही आखाडा मार्गस्त झाला.  त्यानंतर आता शाही स्नानाच्या समाप्तीनंतर सर्वसामान्यांसाठी घाट खुले करण्यात आले आहेत.
त्र्यंबकेश्वर येथील शैव पंथियांची अखेरची पर्वणी २५ सप्टेंबरला पार पडणार आहे.