जळगाव – शहरातील गेंदालाल मिल परिसरातील सराईत तीन गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिले आहेत. किरण बाविस्कर (२४), आकाश बर्वे (२३) आणि महेश ऊर्फ मन्या लिंगायत (२१) तिघे रा. गेंदालाल मिल अशी हद्दपार करण्यात आलेल्या तिघा गुन्हेगारांची नावे आहेत.

हेही वाचा >>> आरोग्य विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीची उद्या मतमोजणी, ५७.८७ टक्के मतदान

या तिघांनी एकत्रितरित्या विविध प्रकारचे गुन्हे केले आहेत. तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे नऊ गुन्हे दाखल आहेत. नागरिकांमध्ये ते दहशत निर्माण करीत होते. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यातर्फे तिघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक राजकुमार यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्याअनुषंगाने त्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले.